– पात्र लाभार्थ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
यवतमाळ :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३० जूनपूर्वी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.
योजनेतील पारदर्शकता वाढवणे, संभाव्य गळती रोखणे आणि केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच योजनेचा थेट लाभ पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार, २० मे २०२६ पासून यासाठी सर्वदूर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत आणि फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळख) पद्धत अशा दोन सोप्या पद्धती उपलब्ध आहेत. ज्या वृद्ध किंवा आजारी लाभार्थ्यांना हालचालीसंबंधी अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘फेस ऑथेंटिकेशन’द्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी तातडीने ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.








