spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खर्गे यांच्या अपमानाचा निषेध; भंडारा जिल्हा काँग्रेसचा धडक मोर्चा; २१ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा

– नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; जनतेच्या विविध प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक

हंसराज,भंडारा :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उत्तराखंडमधील सभेनंतर सभास्थळाचे गंगाजलाने शुद्धीकरण करून त्यांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी जिल्हास्तरीय भव्य मोर्चा व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास २१ ऑगस्ट रोजी अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विश्रामगृह येथून या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा त्रिमूर्ती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर तिथे सत्याग्रह व निषेध सभा घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी आमदार अनिल बावनकर आणि जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बोलताना नाना पटोले म्हणाले की, “संविधानाने दिलेली समानता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची मूल्ये अबाधित ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान हा केवळ एका व्यक्तीचा नसून तो संविधानाचा अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा सन्मान राखण्यासाठी आणि शेतकरी, कष्टकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील.”

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी जिल्ह्यातील शेतीविषयक प्रश्नांवरून प्रशासनावर टीका केली. खतटंचाई, शेतमालाचे थकीत पैसे, विजेची समस्या आणि मनरेगा मजुरांची देयके तातडीने देण्याची मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास काँग्रेस आक्रमक पवित्रा घेईल, असा इशारा त्यांनी दिला.

या मागण्यांसाठी फुंकले रणशिंग जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने पुढील मागण्या केल्या आहेत:

• खतांचा पुरेसा पुरवठा आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई.

• रब्बी धान व मका खरेदीचे थकीत पैसे त्वरित अदा करणे.

• स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करून अखंडित वीज पुरवठा करणे.

• २०१९ पासूनची मनरेगाची प्रलंबित देयके आणि घरकुलाचे हप्ते त्वरित देणे.

• जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणे.

• वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देणे.

• भंडारा शहरातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी.

२१ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी सांगितले की, या सर्व मागण्यांवर प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर येत्या २१ ऑगस्ट २०२६ रोजी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनात जिया पटेल, जय डोंगरे, कविता उईके, शीतल राऊत, मनोज बागडे यांच्यासह  जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Popular Articles