spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धारगाव क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येवर जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक; मुकुंद साखरकर यांच्या नेतृत्वात निवेदन

हंसराज,भंडारा :- धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील खुटसावरी, टेकेपार, पिंपळगाव, माटगी, राजेगाव यांसह विविध गावांतील शेतकरी बांधवांनी आज आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अखंडित वीजपुरवठा आणि लिफ्ट इरिगेशन योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

सध्या शेतीचा हंगाम सुरू असताना धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रात अपुऱ्या आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वीज नसल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले असून, उभी पिके डोळ्यादेखत सुकून जात असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. शेती वाचवण्यासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा मिळणे ही काळाची गरज असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. वीजपुरवठ्यात येणारे तांत्रिक अडथळे दूर करून तो सुरळीत करण्याबाबत प्रशासकीय उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, या परिसरातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ‘लिफ्ट इरिगेशन’ (उपसा सिंचन) योजना सुरू करण्याबाबत तांत्रिक पडताळणी करून सकारात्मक पावले उचलली जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मुकुंद साखरकर म्हणाले की, “शेतकरी हा समाजाचा कणा आहे. त्याला वेळेवर वीज आणि पाणी मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची ठराविक वेळेत अंमलबजावणी करावी. जर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर आम्हाला त्यांच्या न्याय्य हक्कासाठी

रस्त्यावर उतरून तीव्र लढा द्यावा लागेल.”

मागण्या पूर्ण न झाल्यास धारगाव क्षेत्रातील समस्त गावकरी आणि शेतकरी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात टेकेपारचे उपसरपंच इरफान पटेल, निखिल पोटरवार, घनश्याम हारगूदे, संजीव शेंदे, धनराज कायते, राकेश शेंदे, राजेश शेंदे, महादेव चेटुळे, विलास चेटुळे, श्यामराव मस्के, राजू शेंदे, देवदास ठावकर, फत्तू वैद्य, मोरेश्वर मडावी, श्रावण गिरेपुंजे, सुनील डोय, गणेश चेईले, निरदन कडाव, आकाश शेंदे, अरविंद मस्के, योगेश लांजेवार, रामेश्वर गिरेपुंजे, सतीश गायते, धनराज गायधने, श्रावण भिगोरे, सुधाकर वागाडे, अमित थोटे, भीमराव वाहाने, रामचंद्र भैसारे, शुभम थोटे, सत्यवान चेईले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.