spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महामेट्रोविरोधात उमिया गेट, कापसी येथे रस्त्यावर उतरला जनआक्रोश; चक्का जाम आंदोलनानंतर प्रशासन झुकले, ५ दिवसांत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन

कामठी :- भंडारा रोडवरील उमिया गेट, कापसी परिसरात सुरू असलेल्या महामेट्रोच्या रखडलेल्या व निकृष्ट कामांविरोधात अखेर नागरिकांचा संताप रस्त्यावर उसळला. सततची वाहतूक कोंडी, जीवघेणे खड्डे, वारंवार होणारे अपघात आणि पावसामुळे साचणारे पाणी यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी माजी जी प सदस्य दिनेश ढोले यांच्यात नेतृत्वात रविवारी चक्का जाम आंदोलन छेडत प्रशासनाला जागे केले.

गेल्या अनेक दिवसांपासून भंडारा रोडवर मेट्रोचे काम सुरू असले तरी कामातील संथगती आणि नियोजनाच्या अभावामुळे संपूर्ण महामार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने दररोज छोटे-मोठे अपघात घडत असून वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संबंधित विभागांना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त नागरिकांनी उमिया गेट येथे चक्का जाम आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन महामेट्रो, नॅशनल हायवे प्राधिकरण आणि पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांशी चर्चा केल्यानंतर उमिया गेटसमोरील हायवेवरील कट तात्काळ बंद करण्यात आला. तसेच खराब झालेल्या रस्त्याची पुढील चार ते पाच दिवसांत दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल, असे लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले.

नागरिकांच्या एकजुटीमुळे प्रशासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागला असून या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये निश्चितच घट होईल, असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वाखाली रुपेश शेंदरे, आकाश बाराहाते, काळेजी, सोमेश क्षिरसागर, अमोल निधान, निहाल किरमोरे, विक्की करुटकर, सोनू वाडीभस्मे, विश्वास वाडीभस्मे, गौरव बाराहाते, विशाल शेंदरे, नथू शेंदरे, राकेश शेंडे, हटवार तसेच परिसरातील पदाधिकारी, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Popular Articles