spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडाऱ्यात ‘पिरॅमिड गॅस’च्या छुप्या कारभाराचा पर्दाफाश; एमआयडीसीतील अनधिकृत गोदामावर पुरवठा विभागाचा दणका

– ५७ सिलिंडर जप्त; सुरक्षा नियमांना केराची टोपली दाखवत सुरू होता अवैध साठा

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- शहरातील एम.आय. डी.सी. (MIDC) परिसरात अत्यंत गोपनीयरीत्या सुरू असलेल्या ‘पिरॅमिड गॅस एजन्सी’च्या एका अनधिकृत गोदामावर जिल्हा पुरवठा विभागाने गुरुवारी जोरदार छापा टाकला. या कारवाईत घरगुती आणि व्यावसायिक वापराचे तब्बल ५७ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून, संबंधित गोदामाला प्रशासनाकडून ‘सील’ ठोकण्यात आले आहे. स्फोटक विभागाचा परवाना नसताना आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करून हा साठा केल्याचे तपासात उघड झाले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी यांना मिळालेल्या एका विश्वसनीय माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात गॅस सिलिंडरचा अवैध साठा केला जात असल्याची खबर मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी १६ मार्च रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास पुरवठा विभागाच्या पथकाने नियोजनबद्धरीत्या सदर गोदामावर धाड टाकली. यावेळी गोदामाबाहेर गॅस एजन्सीचा कोणताही फलक नव्हता, ज्यामुळे हा साठा लपवण्याच्या उद्देशाने तिथे ठेवल्याचा संशय बळावला.

सुरक्षा यंत्रणेचा अभाव आणि नियमांचे उल्लंघन

तपासणीदरम्यान या गोदामात सुरक्षेची कोणतीही साधने आढळून आली नाहीत. आग लागल्यास ती विझवण्यासाठी आवश्यक असणारी अग्निशमन यंत्रे (Fire Extinguishers) किंवा सिलिंडरचे वजन मोजण्यासाठी लागणारा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, तिथे उपलब्ध नव्हता. विशेष म्हणजे, गॅस साठवणुकीसाठी अत्यंत आवश्यक असलेला ‘विस्फोटक विभाग’ (PESO) चा कोणताही परवाना संबंधित एजन्सीकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कारवाईदरम्यान गोदामात उपस्थित असलेले मनीष भूपेंद्र खारा (५२) यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या वाहनचालकाने “गाडीची बॅटरी डाऊन झाल्यामुळे सिलिंडर इथे ठेवले,” असा अजब दावा केला. मात्र, पुरवठा विभागाने हा दावा फेटाळून लावत, हा साठा अवैध विक्रीसाठीच असल्याचे नमूद केले आहे.

ही धाडसी कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, सहायक पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, खरेदी अधिकारी सुहास टोंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात रोशन कापसे, पोचीराम कापडे, रवींद्र उन्हाळे आणि धीरज मेश्राम या निरीक्षण अधिकाऱ्यांचा समावेश होता. जप्त केलेला साठा गोदामातच सीलबंद करून ठेवण्यात आला असून, संबंधित ऑईल कंपनीला पिरॅमिड गॅस एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

लोकवस्तीच्या किंवा औद्योगिक क्षेत्राच्या जवळ अशा प्रकारे विनापरवाना गॅस साठवणे म्हणजे मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. पुरवठा विभागाच्या या कारवाईमुळे अवैध गॅस विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

जप्त केलेला साठा:

दोन पंचांच्या उपस्थितीत केलेल्या पंचनाम्यात खालील मुद्देमाल आढळला:

१४.२ किलो (घरगुती): ४० रिकामे सिलिंडर

१९ किलो (व्यावसायिक): ८ रिकामे सिलिंडर

१० किलो (घरगुती): २ भरलेले व १ रिकामा सिलिंडर

५ किलो (लहान): १ भरलेला व ५ रिकामे सिलिंडर

अशा प्रकारे एकूण ५७ सिलिंडरचा साठा जप्त करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.