नागपूर ३० : नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाणे हद्दीतील हरिहर नगर, वॉर्ड क्रमांक ९, फांद्री येथे दिनांक २८ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या १० आरोपींवर कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनंतर त्यांनी पंचासह छापा टाकून अमन अन्वर खान, सुशांत मेश्राम, अभिषेक सूर्यवंशी, अनिकेत वैश, सागर बव्हाण, अनंत आटनकर, रोहन बव्हाण, नरेश धुर्वे, विनय भेलावे आणि श्रीकांत शेलारे यांना रंगेहाथ पकडले. आरोपींकडून ५२ ताशपत्ते, ₹८,५००/- रोख, ४ आयफोन व ६ अँड्रॉईड मोबाईल असा एकूण ₹३,८४,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ तसेच नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ११२ (किरकोळ संघटीत गुन्हेगारी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत विशेष बाब म्हणजे मुख्य आरोपी अमन अन्वर खान याच्यावर २०२० पासून अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो नागपूर जिल्ह्यातून हद्दपार असतानाही तो गुन्हा करताना आढळल्यामुळे त्याच्यावर हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल स्वतंत्र कारवाई करण्यात आली आहे. पोलीस तपासात उघड झाल्यानुसार हे सर्व आरोपी संघटीतपणे गुन्हे करत असल्यामुळे कन्हान पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय न्याय संहिता कलम ११२ अंतर्गत कठोर कारवाईसाठी प्रस्ताव सादर करून त्यानुसार गुन्ह्यात कलम वाढवण्यात आले आणि आरोपींना अटक करून प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत रिमांड मंजूर केला. नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण असून जुगार आणि संघटीत गुन्हेगारीविरोधात पोलीस प्रशासन नव्या कायद्यांतर्गत कडक कारवाई करत आहे.




