spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी; गोसेखुर्द प्रकल्पाचे १३ दरवाजे उघडले जिल्ह्यात ‘ग्रीन अलर्ट’ कायम असून वैनगंगा नदी सध्या इशारा पातळीच्या खाली

हंसराज,भंडारा :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २४ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या दैनिक अहवालानुसार, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून प्रमुख जलप्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गोसेखुर्द प्रकल्पाची पाणी पातळी ५६.२२ टक्क्यांवर पोहोचली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे १३ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून १६०५.११ क्युमेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच धापेवाडा प्रकल्पाचे १७ दरवाजे २.०० मीटरने उघडण्यात आले असून तेथून १७४५.०५ क्युमेक विसर्ग सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पुजारीटोला प्रकल्प ८८.१३ टक्के भरला असून बावनथडी २२.८६ आणि संजय सरोवर ६३.१० टक्के भरले आहे.

जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी पाहता सरासरी ६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये मोहाडी आणि लाखनी तालुक्यात सर्वाधिक ७.९ मिमी पाऊस पडला. साकोली ७.५, तुमसर ७.२, भंडारा ५.४ आणि पवनी तालुक्यात ४.९ मिमी पावसाची नोंद झाली असून लाखांदूर तालुक्यात सर्वात कमी ३.३ मिमी पाऊस पडला आहे. १ जून २०२६ पासून आतापर्यंत जिल्ह्याची पावसाची एकूण सरासरी ७९.३ टक्क्यांवर पोहोचली आहे. वैनगंगा नदी सध्या २४३.८० मीटरवर वाहत असून ती २४५.०० मीटरच्या इशारा पातळीच्या खाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भंडारा ते कारधा हा लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून इतर सर्व मार्ग सध्या सुरू आहेत.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे घरांचे नुकसान, जनावरांचा मृत्यू किंवा संपर्क तुटल्याची कोणतीही नोंद झालेली नाही. सध्या जिल्ह्यासाठी ‘ग्रीन अलर्ट’ देण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रातील विसर्गामुळे आणि पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरू नयेत यासाठी नागरिकांनी आरोग्यविषयक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.