spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘वनार्टी’मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात

नागपूर :- न्यायप्रिय, लोककल्याणकारी आणि आदर्श प्रशासनाची उज्ज्वल परंपरा निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त रविवारी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या ‘वनार्टी’मध्ये आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. त्यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून राजमातांना अभिवादन केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रशांत वावगे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी आपल्या दूरदृष्टी, न्यायनिष्ठा आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या बळावर एक आदर्श राज्यव्यवस्था उभी केली. समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी राबविलेल्या योजना, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न तसेच धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सुशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यातून सामाजिक समता, लोकसेवा आणि कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचे मूल्य अधोरेखित होते. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहनही प्रशांत वावगे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला प्रकल्प व्यवस्थापक डॉ. चेतन बन्सोड यांच्यासह ‘वनार्टी’चे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.