spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रामाळा तलाव एसटीपी प्रकल्पाचे काम कासवगतीने

– पाहणी दौर्‍यात उपमहापौर, स्थायी समिती सभापतींनी कंत्राटदाराला खडसावले

– सहा महिन्याचा अल्टीमेटम अन्यथा कारवाई

चंद्रपूर :- येथील ऐतिहासीक प्रसिद्ध रामाळा तलावात जमा होणारे सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत रामाळा तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प सुरू करण्यात आले मात्र १८ महिने होऊनही प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असल्याचे बघून चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिर्‍हे यांनी अधिकार्‍यांना सदर काम तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश देत सबंधित कंत्राटदाराला चांगलेच खडसावले. येत्या ६ महिन्यात प्रकल्पाचे काम पुर्ण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा अश्या शब्दात कंत्राटदाराला खडे बोल सुनावले.

चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समितीच्या सभापती मनस्वी गिर्‍हे यांनी आज मंगळवारी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मनपाचे शहर अभियंता रविंद्र हजारे, उपअभियंता सागर सिडाम यांच्यासमवेत पाहणी दौरा केला. यावेळी उपस्थित कंत्राटदाराला काम कासवगतीने होत असल्याबाबत जाब विचारण्यात आला. कंत्राटदाराकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने उपमहापौर प्रशांत दानव , सभापती मनस्वी गिर्‍हे यांनी येत्या ६ महिन्यात प्रकल्पाचे काम पुर्ण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा अश्या शब्दात कंत्रटदाराला खडे बोल सुनावले.

रामाळा तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी ३० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, केंद्र, राज्य आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. १८ महिन्यांच्या कालावधीसाठी कार्यादेश देण्यात आला होता. मात्र, निर्धारित मुदतीत काम पूर्ण होऊ न शकल्याने कंत्राटदाराने मुदतवाढीची मागणी केली आहे. प्रकल्पांतर्गत जलनगर परिसरातील नाल्यांमधून तलावात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी सुमारे ६०० मीटर रिटेनिंग वॉलचे बांधकाम व इतर काही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. एकूण प्रकल्पाची सरासरी प्रगती सुमारे ५० टक्के झाल्याचे दिसून आले. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पुराणिक ब्रदर्स कन्सल्टिंग इंजिनिअर्स, नागपूर यांनी कामात झालेल्या विलंबाची कारणे नमूद करत मुदतवाढीची शिफारस केली आहे. कार्यादेश मिळाल्यानंतर लगेच पावसाळा सुरू झाल्याने कामात अडथळे आले. त्यानंतर रेती उपलब्ध न होणे, तलावातील पाण्याची वाढलेली पातळी आणि कंत्राटदाराच्या नियोजनातील त्रुटी यामुळे कामाचा वेग मंदावल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांनी पाहणीदरम्यान संबंधित अधिकार्‍यांना कामाची गती वाढवून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शहराच्या पर्यावरणीय आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या रामाळा तलावाच्या पुनरुज्जीवनाकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles