spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धर्म कोणताही असो, जोडीदार निवडण्याचे प्रौढ महिलेला पूर्ण स्वातंत्र्य – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई :- प्रौढ महिलेला तिच्या पसंतीचा जीवनसाथी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. तिच्या या निर्णयावर कोणतीही जबरदस्ती किंवा दबाव आणता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आंतरधर्मीय विवाहाच्या मुद्द्यावर म्हटले. जोडीदाराचा धर्म, जात किंवा श्रद्धा कोणती आहे, यावर तिच्या निवडीच्या अधिकारावर मर्यादा येऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले..

न्या. अद्वैत सेठना आणि न्या. रणजीतसिंह राजा भोसले यांच्या सुटीकालीन खंडपीठाने एका २१ वर्षीय हिंदू तरुणीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे निरीक्षण नोंदवले. या तरुणीने आपल्या पसंतीच्या २१ वर्षीय मुस्लिम तरुणाशी विवाह केला होता. कुटुंबीयांकडून विरोध होण्याची भीती असल्याने तिने पोलिस संरक्षणाची मागणी केली होती.

याचिकेनुसार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांनी विवाह केला. विवाहानंतर दोघांनी धारावी पोलिस ठाण्यात जाऊन विवाहाची माहिती दिली आणि संरक्षणाची मागणी केली. मात्र, पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने कुटुंबीयांपासून संरक्षण मिळावे, यासाठी तिने हायकोर्टात धाव घेतली.

पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकार

सुनावणीदरम्यान खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या ‘शफीन जहाँ विरुद्ध अशोकन के. एम.’ या प्रकरणातील निर्णयाचा संदर्भ दिला. आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकार हा संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत मिळालेल्या जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. ‘कोणत्याही धर्माचा, श्रद्धेचा किंवा जातीचा जीवनसाथी निवडण्याचे प्रत्येक व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. याचिकाकर्ती सज्ञान आणि प्रौढ असल्याने तिला स्वत:च्या इच्छेने जीवनसाथी निवडण्याचा आणि त्याबाबत योग्य निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे निरीक्षण नोंदवले.

Popular Articles