spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अतिक्रमण हटविण्यासाठी हिवरावासियांचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मौदा यांना निवेदन

किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत आदासा अंतर्गत येत असलेल्या हिवरा गावातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी बुधवार (ता. 12 ऑगस्ट) ला उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मौदा यांना ग्रामस्थांमार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रतिलिपी पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही देण्यात आले आहे.

हिवरा येथील गट क्रमांक 56 मधील आराजी 3.40 हेक्टर शासकीय जमीन असल्याचा उल्लेख तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आलेल्या पत्रात करण्यात आला आहे. सदर जमीन महाराष्ट्र शासनाच्या नावावर असून, संबंधित जमिनीचा शासकीय अभिलेखात उल्लेख असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या जमिनीवर कापूस पीक घेतले जात असल्याबाबत तहसील कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून तसेच नागरिकांकडून प्रशासनाकडे यापूर्वी अनेकदा निवेदने देण्यात आली.

विशेष म्हणजे, या प्रकरणी ता. 29 जून 2026 रोजी तहसील कार्यालयाने संबंधितांना शासकीय जमिनीवर कोणत्याही प्रकारची पिकाची लागवड करू नये तसेच अतिक्रमण करू नये, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिल्याचे पत्रात नमूद आहे. मात्र, या प्रकरणात अपेक्षित ती कठोर कार्यवाही झालेली नसल्याने, बुधवार ता. 12 ऑगस्टला हिवरा गावातील शेकडो ग्रामस्थ स्वतः उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

याप्रसंगी गट ग्रामपंचायत आदासा सरपंच संजय आतीलकर,उपसरपंच आकाश मारबदे, माजी सरपंच सुनीता मधुकर जगनाडे, ग्रामस्थ विजय शेंडे,संजय शेंडे सह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. अतिक्रमण हटविण्याची कारवाई तातडीने न केल्यास उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय समोर उपोषणाचा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे. उपोषणाला सुरुवात होण्यापूर्वी हिवरा गावातील अतिक्रमण हटविण्यात संबंधित प्रशासनाला यश येते की अपयश? याकडे संपूर्ण मौदा तालुकावासियांचे लक्ष वेधले आहे, हे विशेष!

Popular Articles