– ग्रामविकास व विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
यवतमाळ :- जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आज पंचायत समिती बाभूळगाव येथे पंचायत समितीअंतर्गत सर्व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद यवतमाळचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे, गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर, जिल्हा व्यवस्थापक, पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख, ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये पंचायत समितीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा विभागनिहाय सखोल आढावा घेण्यात आला. ग्रामविकास, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), प्रधानमंत्री जनमन योजना, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, समाजकल्याण, पाणीपुरवठा, बांधकाम, ग्रामपंचायत प्रशासन तसेच इतर सर्व विभागांच्या कामकाजाची समीक्षा करून प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी मनरेगा अंतर्गत मंजूर सर्व कामे तातडीने सुरू करणे, लाभार्थ्यांचे ई-केवायसी व आधार अद्ययावत प्रक्रिया पूर्ण करणे, प्रलंबित देयके त्वरित अदा करणे, मस्टर वेळेवर काढणे, श्रमिकांना नियमित रोजगार उपलब्ध करून देणे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील अपूर्ण घरे आणि प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत सन २०२५-२६ पर्यंतची सर्व प्रलंबित प्रकरणे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत महिला बचत गटांच्या कामकाजाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यातील महिला बचत गटांची प्रगती, अंतर्गत बचत व कर्ज व्यवहार, बँक लिंकेज, फिरता निधी, समुदाय गुंतवणूक निधी, उपजीविका उपक्रम, कृषी व बिगर कृषी व्यवसाय, महिला उद्योजकता, ग्रामसंघ व प्रभाग संघटनांची प्रगती, आर्थिक सक्षमीकरण तसेच विविध शासकीय योजनांशी बचत गटांची जोडणी याबाबत सखोल समीक्षा करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी महिला बचत गटांना केवळ बचतीपुरते मर्यादित न ठेवता उत्पादन, प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, सूक्ष्म उद्योग आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळावा, बचत गटांचे उत्पन्न वाढावे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम व्हावी, यासाठी उमेद अभियानाने अधिक परिणामकारकपणे कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा, कृषी विभागाच्या विविध योजना, पशुसंवर्धन विभागाच्या पशू आरोग्य सेवा व लसीकरण, आरोग्य विभागाचे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेवा, शिक्षण विभागाची गुणवत्ता, समाजकल्याण विभागाच्या योजना, स्वच्छ भारत अभियान, ग्रामपंचायतींचे प्रशासन, कर वसुली, समग्र भूमापन अभियान, ग्राम नकाशे तसेच विविध विकासकामांच्या गुणवत्तेचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.
प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ वेळेत पोहोचवावा तसेच ग्रामीण विकासाच्या कामांना अधिक गती द्यावी, असे आवाहन केले. बैठकीच्या समारोपावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी उद्दिष्टपूर्तीत मागे असलेल्या विभागांनी विशेष कृती आराखडा तयार करून प्रलंबित कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, विकासकामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, प्रत्येक विभागाने पारदर्शक व नागरिकाभिमुख पद्धतीने काम करावे तसेच पंचायत समितीच्या सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावा, असे स्पष्ट निर्देश दिले.








