Ø 18 डिसेंबरपर्यंत दावे स्वीकारण्यात येणार
Ø 12 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
नागपूर :- विभागातील पदवीधर मतदार संघासाठी 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरिता सुधारित कार्यक्रम घोषित केला आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी मतदार नोंदणीची जाहीर सूचना प्रसिद्ध झाली असून 3 ते 18 डिसेंबर 2025 पर्यंत याबाबत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे तर अंतिम मतदार यादी 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या विशेष मतदार नोंदणी मोहिमेत नागपूर विभागातील सर्व पदवीधरांनी सहभाग घेवून नोंदणी करावी, असे आवाहन नागपूर विभागाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
असा आहे मतदार नोंदणी कार्यक्रम
निवडणूक नोंदणी कार्यक्रमानुसार वर्तमानपत्राद्वारे 15 ऑक्टोंबर रोजी जाहीर सूचनेतील प्रथम पुर्नप्रसिद्धी तर 25 ऑक्टोंबर ला द्वितीय पुर्नप्रसिद्धी करण्यात आली आहे. 6 नोव्हेंबर ही नमुना 18 द्वारे अर्जदारांचे दावे स्वीकारण्याची अंतिम मुदत होती. 3 डिसेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहे तर 3 ते 18 डिसेंबर 2025 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे. 5 जानेवारी 2026 रोजी दावे व हरकती निकालात काढून पुरवणी यादी तयार करण्यात येईल आणि 12 जानेवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघाचे सदस्य अभिजित वंजारी हे 6 डिसेंबर 2026 रोजी निवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पदवी निकाल लागल्यापासून 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत 3 वर्ष पूर्ण झालेल्या पदवीधरांसह सद्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या सर्व पदवीधरांसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी विभागातील 256 मतदान केंद्रांवर निवडणूक पदनिर्देशीत अधिकाऱ्यांकडे ही नोंदणी करता येणार आहे.








