नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या हॉटमिक्स प्लांट विभागाद्वारे शहरातील विविध भागात सुरू असलेल्या रस्ता डांबरीकरणाच्या कार्याची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी मंगळवारी(ता.१८) पाहणी केली. रस्ता डांबरीकरणाचे कार्य सुरू असताना डांबरीकरणाची गुणवत्ता उत्तम राखावी तसेच नागरिकांना कार्याचा त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या हॉटमिक्स प्लांट विभागामार्फत शहरातील विविध भागांतील ५३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यातील मनीष नगर परिसर व सक्करदरा परिसरातील प्रगतीपथावर असलेल्या कार्याची मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी पाहणी केली. याप्रसंगी धंतोली झोनचे सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे, हॉट मिक्स प्लांट विभागाचे कार्यकारी अभियंता अजय डहाके, अनिल गेडाम, हनुमान नगर झोनचे कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, उप अभियंता मनोहर राठोड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, रस्त्यांच्या डांबरीकरणाचे कार्य येत्या ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य हॉट मिक्स प्लांटविभागाला देण्यात आले आहे. त्यानुषंगाने आयुक्तांनी धंतोली झोन अंतर्गत सुरू असलेल्या मनीष नगर परिसरातील आरटीओ सोसायटी, न्यू मनीष नगर, शुभांगी सोसायटी, नवनाथ सोसायटी येथील कार्याची पाहणी केली. तसेच हनुमान नगर झोनचे अंतर्गत सुरू असलेल्या महेश कॉलनी, चंदननगर परिसर, रमाबाई उद्यान परिसरातील कार्याचे अवलोकन केले. विशेष म्हणजे, डांबरीकरण केल्याजात असलेल्या मार्गावर वाहतुक व्यवस्थेवर त्रास होई नये, याकरिता उपद्रव शोध पथकाचे जवान तैनात करण्यात आले आहे.
मनपाच्या हॉट मिक्स प्लांट विभागाने नागपूर शहर वाहतूक पोलिस शाखेशी समन्वय साधून डांबरीकरणाच्या कार्याला सुरुवात केली आहे. डांबरीकरण कार्याकरिता विभागाद्वारे ५ व कंत्राटदाराद्वारे ३ असे एकूण ८ टिप्पर, २ पेव्हर आणि ४ रोलर वाहनांच्या सातत्यपूर्ण कार्यप्रणालीतून निर्धारित उद्दिष्ट पूर्तीसाठी कार्य केले जात आहे. याशिवाय हॉट मिक्स प्लांट विभागात विभागाचे १ आणि कंत्राटदार याचे १ असे एकूण २ जेसीबी, दोन ऑपरेटर, दोन मदतनीस, दोन मजदुर ऑपरेशनल कार्यकर्ता कार्यरत आहेत.




