spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

साकोली पोलिसांचा अवैध रेती माफियांना दणका; ७० लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ जणांवर गुन्हे दाखल

भंडारा, साकोली :- भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली साकोली पोलिसांनी अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. मौजा उमरी शिवारात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये रेतीची चोरी करणारी वाहने आणि यंत्रसामग्रीसह एकूण ७० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई साकोली पोलीस स्टेशनचे पथक गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा उमरी येथे करण्यात आली. शासनाच्या मालकीची रेती विनापरवाना चोरटी वाहतूक करताना अशोक लेलँड कंपनीचा पिवळ्या रंगाचा टिप्पर (क्र. MH 36 AA 7236) आणि एक जेसीबी (क्र. MH 36 AG 7236) रंगेहाथ पकडण्यात आला. या कारवाईत टिप्पर चालक राकेश राजू कापगते (२७, रा. उमरी), जेसीबी चालक खिमेश सुरेंद्र रामटेके (१९, रा. परसोडी) आणि टिप्पर व जेसीबी मालक लालचंद किशन करंजेकर (५०, रा. खंडाळा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसरी कारवाई देखील उमरी ते परसोडी रोडवर करण्यात आली. यात अशोक लेलँड कंपनीचा मिनी टिप्पर (क्र. MH 36 AA 3307) अवैध रेतीची वाहतूक करताना आढळून आला. या प्रकरणी चालक अमित राजू चौधरी (३०, रा. साकोली), क्लिनर मौसम ईश्वर वरकडे (२५, रा. साकोली), टिप्पर मालक ओमप्रकाश उर्फ गोलू धुर्वे (३०, रा. उमरी) आणि जेसीबी मालक अनिकराम शामराव निबेकर (रा. सेंदूरवाफा) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत टिप्पर आणि रेतीसह २० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ७० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध अप क्र. ६४१ /२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०५ (ई) आणि ४९ अन्वये साकोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बेडवाल, पोलीस शिपाई मरकम आणि साकोली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले असून, अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांचा असाच कडक पवित्रा कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.