खापा, वार्ताहर :- गुढीपाडवा जवळ आला असून, या सणापासून मराठी नववर्ष तसेच शेतकऱ्यांच्या ही नवीन वर्षाला प्रारंभ होतो. गुढीपाडव्यापासून नवीन सालगडी ठेवण्यात येतो. यंदा मात्र सालगडी लाखमोलाचा झाला असून, शेतकरी शोध घेत असले तरी कुणीही सालगडी म्हणून राहण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
अनेक वर्षांपासून शेती कामात सालगडी महत्वाचा भाग झाला आहे. सलगड्याला वर्षभरासाठी रक्कम व धान्याच्या स्वरूपात (गहू) मोबदला दिला जातो. जसजशी वर्षे बदलतात सालगड्याच्या मोबदल्यात वाढ झाल्याचे पाहवयास मिळत आहे. शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळत असला तरी सालगड्याचे महत्व आजही कायम आहे. ग्रामीण भागात आज सालगाडी ठेवणे तारेवरची कसरत झाली आहे. तरुण मंडळी आज शेतीची कामे सोडून खाजगी कंपनी मध्ये काम करायला पसंती देत आहेत. त्यामुळे सालगडी मिळणे कठीण झाले आहे.
दरम्यान, यंदा गुरुवार १९ मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा होणार असून, नववर्षारंभाला सालगडी मिळावा यासाठी शेतकऱ्यांकडून शोध घेतला जात आहे. परंतु, अलीकडच्या काळात सालगडी मिळणे कठीण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागणीप्रमाणे सालाचे पैसे मोजूनही मनधरणी करावी लागत असल्याचे चित्र आहे.
“मोठे शेतकरी आले अडचणीत”
नववर्षात सालगडी मिळावा यासाठी शेतकऱ्याकडून सालगडी शोध मोहीम राबविल्या जात आहे. परंतु, अलीकडच्या काळात सालगडी मिळणे कठीण झाले असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. मागणीप्रमाणे वर्षाचे पैसे मोजण्याची तयारी ठेवूनही सालगड्यासाठी मनधरणी करावी लागत आहे.
“रोजंदारीने काम करण्याची तयारी”
मागील पाच वर्षात सालगडी म्हणून राहण्यास कोणी तयार होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शेतमजुरांना विचारणा केल्यास सालगडी म्हणून नको तर महिन्याचे किंवा रोजंदारीने कामाला येतो असे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे, सालगडी मिळणे कठीण झाले आहे.
“वर्षाचे पैसेही द्या, अन् धान्यही”
सालगड्याचे कमीत कमी एक लाख साठ हजार ते दोन लाख रुपये असा साल ठरत असून, त्याला बक्षीस म्हणून वर्षाचे दोन खंडी धान्य म्हणजे चार पोते द्यावे लागते. तर शेतकऱ्याला महिन्याचे पाच कुडव धान्य, १२ महिन्याचे सहा क्विंटल धान्य आणि बक्षीस म्हणून चार क्विंटल असे एकूण वार्षिक दहा क्विंटल धान्य सालगड्याला द्यावे लागत आहे.
प्रतिक्रिया –
१) वाढती महागाई व निसर्गाच्या लहरीपणा मुळे नापिकीला समोरे जाऊन शेतकरी आर्थिक अडचणीत आला असला तरी आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतीकामाच्या मदतीसाठी सालगड्याचा शोध घेत आहोत. यावर्षी एक लाख साठ हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत सालगड्याचे दर कडाडले असून धान्य (गहू) ही द्यावे लागत आहे. यामुळे शेती कशी करावी असाही प्रश्न आहे. – प्रेमचंद पाटील, शेतकरी, टाकळी (भन्साळी).
२) शेतीत वाढते यांत्रिकीकरण पारंपरिक औत पद्धतीसाठी आव्हान ठरत आहे. ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रामुळे काही प्रमाणात मजुरांची गरज कमी झाली असली तरी लहान व मध्यम शेतकऱ्यांना महागडी यंत्रसामग्री घेणे शक्य नसल्याने ते अजूनही सालगजांवर अवलंबून आहेत. – रविंद्र चिखले, सभापती, कृ. उ. बाजार समिती सावनेर.
३) शेती उत्पादनात सालगड्यांचे श्रम आणि कौशल्य महत्वाचे असते. त्यांना योग्य मोबदला व राहण्याची सुविधा दिली जाते. मात्र शेतीतील मनुष्यबळ कमी झाल्याने सालगड्यांचा शोध घ्यावा लागत आहे. – प्रशांत डवले, शेतकरी, सावनेर (खापा).
४) उत्पादनात दरवर्षी होणारी घट, बाजारात शेतमालाचे पडते भाव, यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. अशा परिस्थितीत सालगड्यांना आलेला भाव, मजुरांचे वाढते दर, यामुळे शेती करावी तर कशी, असा प्रश्न पडत आहे. दरवर्षी शेती तोट्याची ठरत असल्याने शेतकरी अडचणीत सापडत आहे. – दिवाकर बोंदरे, शेतकरी, खापा.




