६८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच नागपूरला मान
नागपूर, ०५ : नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, माजी महापौर व विधान परिषदेचे सदस्य संदीप जोशी यांची महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन (MSBA) च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या संघटनेच्या 68 वर्षांच्या इतिहासात प्रथमच नागपूरच्या प्रतिनिधीची अध्यक्षपदी निवड झाली आहे. नागपूरसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.
संपूर्ण राज्यभरातील 31 जिल्हा बास्केटबॉल संघटनांच्या उपस्थितीत 2025-29 या कार्यकाळासाठी एमएसबीएची निवडणूक नुकतीच पार पडली. ॲड. अभिषेक सालियन हे निवडणूक निर्णय अधिकारी होते, तर बीएफआयचे शक्ती सिंह गोहिल आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे प्रदीप गंधे हे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
या निवडणुकीत नागपूरचे आणखी एक यश म्हणजे नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोशिएशनचे सचिव भावेश कुचनवार यांची महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. मुंबईचे गोविंद कृष्णन मुथुकुमार हे सचिव आणि इब्राहीम लकडवाला हे कोषाध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.
यासोबतच, विक्रांत पाटील, एस. रामकृष्णन आणि एम. वेंकटेश यांचीसुद्धा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली असून, पुण्याचे ललित नहाटा आणि अमरावतीचे जयंत देशमुख हे सहसचिव झाले आहेत. श्रीनिवास सापे, मनोज रेड्डी, शशिकांत नांदगावकर आणि अश्विन चंदेल हे कार्यकारिणी सदस्य आहेत. रत्नागिरी, नांदेड, जळगाव व बीड जिल्ह्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून निवडले गेले आहेत.
विशेष म्हणजे, ही निवडणूक महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोशिएशन आणि बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यातील गेल्या सहा वर्षांपासून सुरु असलेल्या वादानंतर दोन्ही संघटनांकडून मान्यता पुन्हा बहाल झाल्यानंतर पार पडली. त्यामुळे ही निवडणूक संघटनेसाठी नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे.
खेळ आणि संघटनेत विकास घडविण्यासाठी कटिबद्ध : आ. संदीप जोशी
महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आ. संदीप जोशी म्हणाले, कबड्डी, कुस्तीसोबतच बास्केटबॉल हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे. या खेळाबद्दलच्या प्रेमाची आणि नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेतील माझ्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. या विश्वासाबद्दल मन:पूर्वक आभार! महाराष्ट्रात राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहावे आणि खेळाडूंच्या अडचणींवर तोडगा निघावा,यासाठी मी कटिबद्ध आहे. आपली साथ मोलाची आहे! हे पद म्हणजे नागपूरच्या क्रीडाजगताची ताकद सिद्ध करणारा क्षण आहे. मी खेळ आणि संघटन या दोन्ही क्षेत्रात विकास घडवण्यासाठी कटिबद्ध आहे.




