Home Latest News संजय राऊत यांनी पत्राचाळ व्यवहारातून काळा पैसा पांढरा केला 

संजय राऊत यांनी पत्राचाळ व्यवहारातून काळा पैसा पांढरा केला 

0
58

– भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा आरोप

– राऊतांनी ‘एसआरए’ प्रकल्पात शेकडो मराठी कुटुंबांना फसवून देशोधडीला लावले 

मुंबई :- पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यात प्रवीण राऊतमार्फत खा. संजय राऊत यांनी काळा पैसा पांढरा केला, शेकडो मराठी कुटुंबांची फसवणूक करून त्यांना देशोधडीला लावत राऊतांनी काळ्यापैशाचा पांढ-यात व्यवहार केला. मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला लुटणा-यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा काडीमात्रही अधिकार नाही, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बन यांनी संजय राऊत आणि उबाठा गटाला भूखंड व एसआरए घोटाळ्या वरून लक्ष्य केले. भूखंडाचे श्रीखंड आणि एसआरएमधील मलिदा फस्त करून संजय राऊत-प्रवीण राऊत टोळीने झोपडपट्टीवासियांची फसवणूक करून त्यांची लूट केली. महाविकास आघाडीच्या काळात झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. कोविडच्या काळात जम्बो कोविड सेंटर व खिचडी घोटाळ्याद्वारे मुंबईकरांना लुटण्यात आले. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम राऊतांनी केले अशी बोचरी टीका बन यांनी केली.

बाळासाहेबांचा ब्रँड आता भाजपासोबत – ठाकरे गटाची किंमत शून्य

महाराष्ट्रात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड होता आणि आहे. मात्र हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिल्याने ठाकरे गटाची ब्रँड व्हॅल्यू आता संपली आहे. आज महाराष्ट्रात फक्त भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांचा ब्रँड टिकून आहे असे बन यांनी अधोरेखित केले.

संजय राऊतांचे मराठवाड्यावरील प्रेम म्हणजे ‘पुतना मावशीचे प्रेम’

मराठवाड्यातील पूरग्रस्तांबद्दल संजय राऊत यांचे प्रेम ‘पुतना मावशीसारखे प्रेम’ आहे. भाजपा महायुती सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्यक्ष पीडित क्षेत्रात कार्यरत आहे, खा. राऊत फक्त टीका करण्यात मशगुल आहेत असा निशाणा बन यांनी साधला. भाजपा महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून मदत करत आहे. मराठवाड्यातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ लक्ष घालून युद्धस्तरावर बचावकार्य आणि मदतकार्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन हे थेट मैदानात उतरून पूरग्रस्तांच्या मदतीला धावले, भाजपा कार्यकर्ते गावोगावी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत. भाजपा व केंद्र सरकारने महाराष्ट्राला नेहमीच आपत्कालिन स्थितीत सर्वाधिक मदत दिली आहे असेही बन यांनी नमूद केले. काँग्रेसच्या काळात मात्र महाराष्ट्राला तुटपुंजे सहाय्य मिळाल्याची आठवणही बन यांनी करून दिली.