spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घोटाळेबाज संजय राऊतांनी आधी साडेनऊ हजार कोटींचा हिशेब द्यावा

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ओढला आसूड

मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोलीचा विकास होत आहे. तेथे स्टील हब निर्माण करण्याचे काम सुरु आहे. स्थानिक आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणावर रोजगार दिला जातोय. आरोग्य सुविधा, चांगले रस्ते, सुसज्ज इमारती उभ्या राहत आहेत आणि राज्य सरकारने तेथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. पैसे कसे खायचे, हे जनाब संजय राऊत यांनाच जास्त माहिती आहे. अडीच वर्षं महाविकास आघाडीचे सरकार असताना रोज शंभर कोटी रुपये या हिशेबाने कमावलेल्या साडेनऊ हजार कोटींचा हिशेब त्यांनी द्यावा. पत्राचाळीत, खिचडी घोटाळ्यात, कामगारांचे शोषण करून त्यांचे पैसे खाणाऱ्या संजय राऊत यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदेश देत गडचिरोलीतील आश्रमशाळेची मान्यता रद्द केली आहे. दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वतः आदिवासी विकासमंत्री तेथे जाऊन पुढच्या कारवाईचे आदेश देणार आहेत. ही आश्रमशाळा चालवणारे मारुतराव कोवासे हे काँग्रेसचे तीनवेळा आमदार आणि एकदा खासदार होते. सरकार या शाळांना अनुदान देते. परंतु ते अनुदान खर्च करण्याची जबाबदारी संस्थाचालकांवर असते. त्यात चुकीचे झाल्यानंतर सरकार कारवाई करते. संजय राऊत, तीन विद्यार्थिनींचा जीव गेला. या प्रकरणात तुम्ही राहुल गांधींना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना जाब विचारणार आहात का, असा सवाल बन यांनी उपस्थित केला.

शिवसेना कुणाची याचा निकाल जनतेच्या न्यायालयात लागलाय आणि, खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे. खरी शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्यांची असल्याचा कौल जनतेने दिला आहे. एकदा सर्वोच्च न्यायालयाने जर का या चिन्हावर शिक्कामोर्तब केले तर न्यायालयाच्या विरोधात बोलू नका. कारण निवडणूक आयोगाने तुमच्याविरोधात निकाल दिला की, निवडणूक आयोग दलाल होतो. न्यायालयाने तुमच्याविरोधात एखादा निर्णय दिला की, न्यायालयाला दुषणे दिली जातात. आज सर्वोच्च न्यायालयाचे कौतुक करतात आणि उद्या निकाल आल्यानंतर लगेच खडे फोडायला सुरुवात करता. ही डबल ढोलकी संजय राऊत यांची आहे, या शब्दात बन यांनी त्यांना फैलावर घेतले.

काल संसदेमध्ये कोण घाबरले, हे देशाने पाहिल्याचे सांगून बन म्हणाले, अमित शाह संसदेत आले आणि राहुल गांधींनी संसदेपासून पळ काढला. राहुल गांधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पळून गेले होते. पंधरा दिवसांपूर्वीही ते कुठेतरी परदेशात कुणासोबत तरी पळून गेल्याचे या देशाने पाहिले आहे. त्यामुळे पळपुटा कोण आहे आणि प्रश्नांना सामोरे जाणारे कोण आहेत, हे देशाला माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह नेतृत्व देशाने स्वीकारले. संसदेमध्ये उत्तर देण्याची अमित शाह यांची तयारी आहे, पण राहुल गांधींची उत्तरे ऐकायची तयारी नाही. संजय राऊत, विनाकारण अमित शहा यांच्या नावाने ओरडण्यापेक्षा राहुल गांधींना लोकसभेत बसायला सांगा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊन तुमचे तोंड बंद करण्यासाठी अमितभाई सक्षम आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.