spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा गौरव

यवतमाळ :- निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती झरी जामणीच्या मुख्य सभागृहात शिष्यवृत्ती परीक्षा व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ मध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करावी तसेच सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि जिज्ञासू वृत्तीच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागाच्या विविध निर्देशांकांवर प्रभावीपणे काम सुरू असून, झरी जामणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ मध्ये तालुक्यातील एकूण आठ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये वेडद येथील पूरब गावंडे, सानिया धोबे, सात्विक चौधरी व प्रतीक घुंगरुड, दुर्गापूर येथील देवांश शत्रुघ्न कोवे, जान्हवी सुजित काटकर व शिवम सचिन सिडाम तसेच खातेरा येथील यश नारायण भोयर यांचा समावेश आहे.

यावेळी शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. देवराव शिवराम मेश्राम, ठकसेन पेन्दोर, विनोद तात्याजी मडावी, मंगेश खामनकर, विनोद पोलचेट्टीवार, शिवरकर सर, विभाताई मडावी, विनोद वैरागडे आणि राकेश मदिकुटावर यांचा सत्कार करण्यात आला.

या गुणगौरव कार्यक्रमामुळे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच विविध शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नवी प्रेरणा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. तसेच संक्रमण दर व शाळा प्रवेश दर वाढण्यास मदत होत असून, जिल्हा परिषद शाळांबाबत पालकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे, तहसीलदार अक्षय रासने, गटविकास अधिकारी रविंद्रकुमार सांगळे, गटशिक्षणाधिकारी निलेश खैरनार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत समिती प्रशासन, शिक्षण विभाग तसेच निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाचे फेलो अनिल नरवाडे यांनी विशेष सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.