– खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या कवायतींनी वेधले लक्ष
भंडारा :- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पंचायत समिती भंडारा अंतर्गत जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा दवडीपार (बा) येथील क्रीडांगणावर आयोजित तीन दिवसीय ‘शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवा’चे गुरुवारी, १ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात उद्घाटन झाले. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद भंडाराच्या अध्यक्ष कविता उके होत्या. सह-उद्घाटक म्हणून भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर, पंचायत समिती सभापती कल्पना कुर्जेकर, उपसभापती नागेश भगत, माजी उपसभापती प्रशांत खोब्रागडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीषा गजभिये, गटविकास अधिकारी प्रमोद हुमणे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कवायत आणि सांस्कृतिक सादरीकरणाने रंगली पहिली सायंकाळ
उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत प्राथमिक व माध्यमिक गटातील मुलांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रेक्षणीय कवायती सादर केल्या. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दुपारच्या सत्रात समूहगीत गायन, नाटिका आणि समूह नृत्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मान्यवरांची या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य अनिता भुरे, विनोद बांते, अस्मिता डोंगरे, रजनीश बनसोड, यशवंत सोनकुसरे, प्रेमदास वनवे, आशा डोरले, गायत्री वाघमारे, नंदा झंजाड, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. यशवंत लांजेवार, पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील येरमल यांचीही उपस्थिती होती. तसेच पंचायत समिती सदस्य रत्नमाला चेटूले, संजय बोंद्रे, भाग्यश्री कावळे, विलास हळदे, वर्षा वैरागडे, प्रभाकर बोधिले, सीमा रामटेके, काजल चवडे, किशोर उवकर, पंकज लांबट, स्वाती मेश्राम, गीता कागदे, कांचन वरटे, कांचन घरडे, भागवत हरणे, राजेश वंजारी, कीर्ती गणवीर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
आयोजनात ग्रामपंचायतीचा पुढाकार
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सरपंच राजकिरण मेश्राम, उपसरपंच अनंता लांजेवार, सदस्य पंकज धुर्वे, प्रमोद गोसावी, संजय मडावी, संदीप धांडे, पल्लवी हजारे, कल्पना गोस्वामी, चैताली चौधरी, प्रमिला भोजनकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत आखाडे आणि हुमणे (सहा. प्रशिक्षणार्थी) परिश्रम घेत आहेत. क्रीडा क्षेत्राचे सूत्रसंचालन महेश पावलकर, परमेश्वर एनकीकर आणि महेश जगनिक यांनी केले.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (२ जानेवारी) खो-खो आणि कबड्डीच्या अटीतटीच्या स्पर्धा होणार आहेत. तर ३ जानेवारी रोजी वैयक्तिक स्पर्धा आणि उर्वरित सामने होऊन दुपारी ३:३० वाजता पारितोषिक वितरण समारंभाने या महोत्सवाची सांगता होईल. या क्रीडा महोत्सवामुळे दवडीपार परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




