spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बनावट ब्रँड स्टिकर लावून वजनकाट्यांची विक्री; 200 हून अधिक मशीन जप्त

– ब्रह्मपुरीतील आशिष पारधी आणि सुरज पारधी दोघांविरुद्ध चौकशी सुरू

 सतीश कडू,प्रतिनिधी चंद्रपूर :- जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात बनावट ब्रँड स्टिकर लावून तसेच बनावट बिलबुकांच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी साई वेइंग स्केल, एस ए सर्विसेस, एस ए आय वेइंग सर्विसेस याच्या प्रो.आशिष मधुकर पारधी व सुरज मधुकर पारधी (रा. उदापूर, ता.ब्रह्मपुरी, जि.चंद्रपूर) यांच्यासह इतर काही वजन-मापे व्यवसायिकांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलीस व वैधमापन शास्त्र विभागामार्फत तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधितांनी संगनमत करून शार्प इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीच्या नावाने बनावट बिलबुक छापल्याचा तसेच श्री साई स्केल कंपनी यांच्या मालकीच्या TM SANSUI या ब्रँडचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. नॉन-स्टँडर्ड व फॅब्रिकेटेड वजनकाट्यांवर नामांकित ब्रँडचे बनावट स्टिकर लावून बाजारात विक्री केल्याची बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. या संदर्भात ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन तसेच वैधमापन शास्त्र विभाग, चंद्रपूर-गडचिरोली यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांच्या पथकासह वैधमापन शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित आस्थापनांवर संयुक्त कारवाई केली. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात नॉन-स्टँडर्ड व नियमबाह्य वजनकाटे आढळून आल्याने अंदाजे 200 हून अधिक मशीन जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक चौकशीत वैधमापन शास्त्र अधिनियम, 2009 मधील विविध तरतुदींचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्याने अधिक सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तसेच वैधमापन शास्त्र विभागाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शार्प इन्स्ट्रुमेंट्स व श्री साई स्केल कंपनी यांच्या वतीने ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणतेही वजनकाटे अथवा वजन-मापे खरेदी करताना त्यावर वैध पडताळणी प्रमाणपत्र, स्टॅम्पिंग प्लेट, अधिकृत सील आणि नियमानुसारची कागदपत्रे असल्याची खात्री करावी. तसेच अधिकृत वितरकांकडूनच ब्रँडेड व प्रमाणित उत्पादने खरेदी करून फसवणुकीपासून सावध राहावे.

सदर प्रकरणामुळे वजन-मापे क्षेत्रातील नियमबाह्य व्यवहारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तपास पूर्ण झाल्यानंतर आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.