spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रशासनाची लाज काढली! सिहोऱ्यात ‘कुंभकर्णी’ बांधकाम विभागाऐवजी व्यापाऱ्यानेच बुजवले रस्त्यावरील खड्डे

– शौकत शेख यांचा पुढाकार; स्वखर्चाने बस स्थानकावरील खड्ड्यांचे केले दुरुस्ती

भंडारा,तुमसर :-  तुमसर-बपेरा राज्य मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र ‘कुंभकर्णी’ झोपेत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी, सिहोरा येथील ताज मेडिकल स्टोअर्सचे संचालक शौकत शेख यांनी अखेर पुढाकार घेतला. बस स्थानक परिसरात मृत्यूला आमंत्रण देणारे जीवघेणे खड्डे त्यांनी स्वखर्चाने बुजवून सुस्त प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना चपराक लगावली आहे.

‘मृत्यू मार्ग’ बनला तुमसर-बपेरा मार्ग तुमसर-बपेरा राज्य मार्ग सध्या प्रवाशांसाठी ‘मृत्यू मार्ग’ ठरत आहे. बायपास वळणापासून तर बपेरापर्यंत ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत असून, खड्ड्यातील गढूळ पाणी अंगावर उडत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी अनेकदा आंदोलने झाली, मात्र रस्ते विकास महामंडळ आणि बांधकाम विभागाला अद्याप जाग आलेली नाही.

व्यापारी नगरीत अपघातांचे सावट सिहोरा हे परिसरातील ४० ते ४५ गावांसाठी मुख्य व्यापार केंद्र आहे. शाळा, महाविद्यालये आणि मोठी बाजारपेठ असल्याने येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, बस स्थानक परिसरातील खड्ड्यांमुळे या भागाला ‘मृत्यू नगरी’चे स्वरूप आले आहे. ताज मेडिकलचे संचालक शौकत भाई शेख यांच्या दुकानासमोरच हे मोठे खड्डे असल्याने, अपघात आणि नागरिकांचे हाल त्यांना दररोज पहावे लागत होते. अखेर त्यांनी कोणाचीही वाट न पाहता स्वतः गिट्टी आणि मुरूम मागवून ४ ते ५ मोठे खड्डे बुजवून काढले.

प्रशासनाची शोकांतिका शौकत शेख यांनी सामाजिक बांधिलकीतून हे काम केले खरे, मात्र हे काम ज्यांचे आहे, त्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही प्रतिनिधी यावेळी फिरकला नाही. सामान्य नागरिक रस्त्यावरील खड्डे बुजवत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष होणे, ही मोठी शोकांतिका असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. शौकत शेख यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, आता तरी प्रशासनाने उरलेल्या मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी सिहोरावासीयांनी केली आहे.

Popular Articles