– मोबाईल बाजूला ठेवून दोन्ही मुलींनी जपली जुनी परंपरा; सगळ्यांकडून होतंय कौतुक
हंसराज,भंडारा :- दिवाळी आली की घराच्या अंगणात मातीचा किल्ला बनवणे, ही आपल्या महाराष्ट्रात खूप जुनी आणि छान परंपरा आहे. यातून लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या गड-किल्ल्यांची माहिती होते. हीच परंपरा पुढे चालू ठेवत कु. श्रेया आणि कु. आराध्या गोंडाने यांनी यंदाच्या दिवाळीत स्वतःच्या हाताने एक अतिशय सुंदर मातीचा किल्ला तयार केला आहे.
श्रेया आणि आराध्या या दोघींनी मिळून माती, छोटे दगड आणि पाण्याचा वापर करून हा किल्ला बनवला आहे. किल्ल्याचे दरवाजे, बुरुज, चढण्यासाठी पायऱ्या आणि त्यावर लावलेला भगवा झेंडा अगदी खराखुरा वाटतो. किल्ल्यावर त्यांनी शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे छोटे-छोटे पुतळेही ठेवले आहेत. किल्ल्याच्या आजूबाजूला हिरवे गवत आणि रांगोळी काढल्यामुळे हा किल्ला दिसायला खूपच मस्त वाटत आहे.
आजकालची लहान मुले जास्त वेळ मोबाईल आणि टीव्हीमध्येच घालवतात. अशा काळात मोबाईल बाजूला ठेवून, स्वतः मातीत उतरून किल्ला बनवल्यामुळे या दोन्ही मुलींचे काम कौतुकास्पद ठरले आहे.
श्रेया आणि आराध्या यांनी बनवलेला हा सुंदर किल्ला पाहून गल्लीतले लोक आणि नातेवाईक या दोन्ही चिमुकल्यांचे खूप कौतुक करत आहेत आणि त्यांना शाबासकी देत आहेत.






