spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा जिल्ह्यातील धान आधारभूत खरेदी केंद्रे तातडीने सुरू करा!

– खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट टाळण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलावे : डॉ. यशवंत लांजेवार यांची मागणी

हंसराज, भंडारा :- भंडारा जिल्हा हा राज्याचा प्रमुख धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित हे धान पिकावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी अतोनात कष्टाने यंदाचे पीक पदरात पाडून घेतले असून, आता हा उत्पादित धान विकण्यासाठी शासकीय आधारभूत खरेदी केंद्रे कधी सुरू होणार, याकडे बळीराजा डोळे लावून बसला आहे. या पार्श्वभूमीवर नंदगोपाल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार यांनी जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याची आक्रमक मागणी प्रशासनाकडे केली आहे.

शासकीय खरेदी केंद्रे सुरू होण्यास विलंब झाल्यास शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत हतबल होऊन शेतकऱ्यांना आपला धान हमीभावापेक्षा कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागतो, ज्यामुळे शेतकऱ्यांची उघड आर्थिक लूट होते. ही संभाव्य लूट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळ न दवडता तातडीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, असा इशारा डॉ. लांजेवार यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेल्या धानाला शासनाचा अधिकृत हमीभाव मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे प्रशासनाने खरेदी केंद्रांवरील आवश्यक ती सर्व पूर्वतयारी, शेतकरी नोंदणी प्रक्रिया आणि बारदान्यासह इतर नियोजन विनाविलंब पूर्ण करून प्रत्यक्ष धान खरेदी तत्काळ सुरू करावी, असेही ते म्हणाले.

केवळ आश्वासने नको, प्रत्यक्ष खरेदी सुरू करा! शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाने पूर्ण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. केवळ कागदी नियोजन किंवा आश्वासने न देता प्रत्यक्ष खरेदी केंद्रे तातडीने सुरू करून भंडारा जिल्ह्यातील हवालदिल धान उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा, अशी ठाम भूमिका डॉ. यशवंत लांजेवार यांनी मांडली आहे.

Popular Articles