– सेवा पंधरवडामध्ये ६६ हजार ४६८ महिलांची आरोग्य तपासणी
नागपूर :- केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाला नागपूर शहरात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये मनपाच्या विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयोजित शिबिरामध्ये शहरातील ६६ हजार ४६८ महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात मनपाच्या १६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. १७ सप्टेंबरला मनपाच्या नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून नागपूर शहरात या अभियानाचा शुभारंभ झाला. यानंतर शांती नगर, पारडी, मानेवाडा, भांडेवाडी, भालदारपुरा, कामगार नगर, कॉटन मार्केट, पाचपावली, कपिल नगर, फुटाळा, के.टी. नगर, हिवरी नगर, आयुष, सोनेगाव या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे शिबिर घेण्यात आले. सर्व ठिकाणी आयोजित शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध ठिकाणी आयोजित या शिबिरांना मोठ्या संख्येत लोकप्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली होती. जास्तीत जास्त महिला व नागरिकांना शिबिराचा लाभ घेता यावा याकरिता मल्टीस्पेशिॲलिटी विशेष शिबिर तसेच स्क्रिनिंग शिबिरांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरांसाठी मनपाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, एम्स नागपूर, , एचसीजी कॅन्सर इन्स्टिट्यूट, माधव नेत्रालय, एबीओ नेत्रालय, आयएमए नागपूर, भारतीय प्रसूती आणि स्त्रीरोग संस्था महासंघ (FOGSI), कुष्ठरोग विभाग, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागपूर, महात्म्ये नेत्र रुग्णालय, लता मंगेशकर हॉस्पिटल, दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यासह इतर हॉस्पिटल्स आणि विविध रक्तपेढी चे सहकार्य मिळाले. शिबिरामध्ये महिलांचे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना कार्ड तयार करण्यात आले. रक्तदान शिबिर, महिलांचे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठी तपासणी, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठीची तपासणी, जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग तपासणी, किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन, गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी तपासणी व समुपदेशन, हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आल्या. तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन आणि बालकांचे आवश्यकतेनुसार लसीकरण देखील करण्यात आले. याशिवाय क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषक आहार उपलब्ध करुन देण्यासाठी आणि क्षयरोगाविरुध्द जन आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटनांना निक्षय मित्र बनवून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
मनपाच्या दहाही झोन स्तरावर आयोजित या शिबिरांच्या यशस्वितेसाठी नोडल अधिकारी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, महिला नोडल अधिकारी माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड यांच्या नेतृत्वात नियुक्त शिबिर नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. शिल्पा जिचकार, डॉ. अश्विनी निकम, डॉ. राजेश बुरे, डॉ. मिथुन खेर्डे, डॉ. अश्विनी वाघे, अर्चना खाडे, दिपाली गणोरकर, ज्योती मानकर, प्रफुल्ल किन्हीकर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक डॉ. शुभांगी कुंभारे, डॉ. चैती हटवार, डॉ. दिव्या बनकर यांच्या देखरेखीत सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी व संबंधित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी या सर्वांनी समन्वयाने कार्य केले. 

शिबिरातील महत्वाची आकडेवारी
मल्टीस्पेशिॲलिटी विशेष शिबिर – २५८ + स्क्रिनिंग शिबिर – १७८१
एकूण नोंदणी – ६६४६८
हायपरटेन्शन तपासणी – ४९३६४
मधुमेह तपासणी – २४३४६
तोंड, स्तन, आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी – २३०५३
गर्भवती महिला तपासणी – ३०८४
ॲनिमिया तपासणी – ५९४१
बालकांना लसीकरण – ३२७१
क्षयरोग तपासणी – ५४४७
निक्षय मित्र नोंदणी – २५८
सिकलसेल तपासणी – ४२६६
सिकलसेल कार्ड वितरीत – ३१०
विविध आजारांबाबत समुपदेशन – ६२८९४
प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना/वय वंदन योजना कार्ड तयार – १७०६
एकूण युनिट रक्त संकलन – २३२








