कुही :- तालुक्यातील तितूर–चितापूर मार्गावर मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान बस क्रमांक MH 31 FC 0380 असलेली नागपूरवरून तितूर मार्गे चितापूरकडे जाणारी स्टार बस अपघातग्रस्त झाली. धान रोवणीच्या कामांना वेग आल्याने ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेला चिखल मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर साचला होता. याच चिखलावर बस घसरल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या खाली उतरल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
अपघातादरम्यान बसची धडक रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका दुचाकीला बसल्याने दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुदैवाने बसमध्ये त्यावेळी केवळ एकच प्रवासी होता. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातात चालक व प्रवासी दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. विशेष म्हणजे चिखलावरून बस स्लिप होऊन थेट जाणे थोडे अवघड असून बस वेगात असल्याचा अंदाज काही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
धान रोवणीच्या हंगामात शेतातून ये-जा करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांवरील चिखल रस्त्यावर साचत असल्याने वाहन घसरण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी रस्त्यावरील चिखल तातडीने हटवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





