spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कंत्राटी तांत्रिक कामगारांचा बोनस तात्काळ द्यावे महावितरणच्या संचालकांकडे निवेदन

नागपूर :- महावितरणच्या विविध उपकेंद्रे व वितरण केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आणि स्मार्ट सर्व्हिसेस प्रा.लि. या कंत्राटदार कंपन्यांमार्फत कार्यरत तांत्रिक कंत्राटी कामगारांना ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील बोनसची रक्कम अद्याप अदा करण्यात आलेली नसल्याने ती तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी तांत्रिक कामगार युनियन (रजि. क्र.५०५९) प्रणित तांत्रिक ॲप्रेंटिस, कंत्राटी कामगार (कर्म.) असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात असोसिएशन च्यावतीने महावितरणचे संचालक (मानव संसाधन), प्रकाशगड, मुंबई यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी सांगितले की, संबंधित कंत्राटी तांत्रिक कामगारांनी प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र सेवा बजावत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र, त्यांच्या हक्काचा बोनस अद्यापही प्रलंबित असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बोनस हा कामगारांचा कायदेशीर व नैसर्गिक हक्क असून त्याच्या वितरणात होत असलेल्या विलंबामुळे अनेक कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याचा परिणाम त्यांच्या कुटुंबीयांवरही होत असून संबंधित कंत्राटदार कंपन्यांना तातडीने निर्देश देऊन प्रलंबित बोनसची रक्कम अदा करावी तसेच बोनस वितरणाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने, राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस प्रदीप पाटील, राज्य उपाध्यक्ष नितीन भैय्या चव्हाण, राहिल शेख, धीरज घायवट, उपसरचिटणीस अतुल पाटील, दत्तात्रय रायकर, राज्य सचिव विक्रम वाकचौरे, अजित दजगुडे, राज्य संघटक प्रताप खंदारे आणि कोषाध्यक्ष राम पाटील यांनी पाठिंबा दिला असून, कामगारांना बोनसची रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे.

Popular Articles