spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सांगली महापालिकेतील वीजबिल गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई – राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, १० : सांगली महापालिकेतील पथदिव्यांच्या वीजबिल देयकांमध्ये तब्बल १ कोटी २९ लाख ९५ हजार रुपयांच्या झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून यामध्ये दोषी असलेल्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ.भोयर बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, परिणय फुके यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

महावितरणकडे महापालिकेने ९ कोटी ८८ लाख ६६ हजार १३३ रुपयांचा धनादेश दिला, मात्र प्रत्यक्षात महापालिकेचे वीजबिल केवळ ८ कोटी ८५ लाख ७० हजार रुपये होते, असे सांगून राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, उर्वरित रक्कम खासगी ग्राहकांच्या वीजबिलापोटी भरल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी आतापर्यंत ११ आरोपींची नावे निश्चित झाली आहेत. तपासासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले आहे. या पथकात पोलीस निरीक्षक, चार्टर्ड अकाउंटंट आणि तत्कालीन उपायुक्त वैभव साबळे यांचा समावेश होता. मात्र, तपासादरम्यान साबळे स्वतः लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले आणि त्यांनी ज्या प्रकरणात लाच घेतली, त्याचा संबंध सांगलीचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी असल्याचा संशय व्यक्त झाला आहे.

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून एक महिन्याच्या आत संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. चौकशी दरम्यान खासगी ग्राहकांचे वीजबिल महापालिकेच्या निधीतून भरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात महापालिकेतील तसेच बँकेतील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय एसआयटी चौकशीत व्यक्त करण्यात आला असल्याचेही राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले.

राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले की, शुभम गुप्ता दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. सर्व संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई लवकरच केली जाईल.

@filephoto


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.