– महापौर निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांकडून अधिकाधिक मालमत्ता कर वसुलीवर भर द्यावा, चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास अवघे ४२ दिवस शिल्लक असून, मालमत्ता कर वसुलीसंदर्भात प्रत्येक झोनला उद्दिष्ट निर्धारित करून देण्यात आलेले आहेत. नागपूर महानगरपालिकेचे उत्पन्न वाढावे यादृष्टीने चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी अर्थात ३१ मार्चपूर्वी निर्धारित उद्दिष्टपूर्तीकरिता मालमत्ता कर वसुलीवर अधिकाधिक भर द्यावा असे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी दिले. तसेच नागरिकांनी देखील आपल्या मालमत्तेचा कर भरणा करून शहराच्या विकासात सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील महापौर यांनी केले.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये मंगळवारी (ता.१७) कर विभाग, बाजार विभाग तसेच स्थावर विभाग संदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीत उपमहापौर लिला हाथीबेड आणि सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, उपायुक्त मिलिंद मेश्राम, अशोक गराटे, गणेश राठोड, मंगेश खवले, नगररचना विभागाचे उपसंचालक गिरीश गोडबोले, सहायक आयुक्त, धनंजय जाधव, विजय थूल, विकास रायबोले, राजकुमार मेश्राम, हरिष राऊत, प्रमोद वानखेडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक ऋतुराज जाधव यांच्यासह मनपाचे कर आणि स्थावर विभागातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी मालमत्ता कर विभागाकडून 2025-26 च्या कर आकारणीचे सादरीकरण महापौर निता ठाकरे यांच्यासमोर केले. मनपाद्वारे सर्व झोन कार्यालयाला मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, उदिष्टपूर्तीसाठी अधिकारी व कर्मचारी कार्यतत्पर असल्याचे उपायुक्त महसूल मिलिंद मेश्राम यांनी सांगितले. यावेळी महापौर निता ठाकरे यांनी जास्तीत जास्त मालमत्ता कर वसूल करण्यात यावा, याशिवाय नियमित कर वसुली वाढविण्याची सुद्धा आवश्यकता आहे. त्याकरिता नवीन निर्माण होणाऱ्या मालमत्ताना कर निर्धारण क्षेत्रात आणल्यास व मालमत्तेच्या बदलानुरूप मालमत्ता कर सुद्धा वेळीस अद्ययावत करण्यात यावा. शहराच्या विकास कामांकरिता नियमित मालमत्ता कर वसुली होणे अत्यावश्यक असून त्यादृष्टीने प्रत्येक झोन स्तरावर सहायक आयुक्त यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. झोन स्तरावर नियमाने पालन करून सक्तीने मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही करण्यात यावी. असेही त्यांनी सांगितले.




