spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विद्यार्थ्यांनी केली नागपूरच्या ऐतिहासिक स्थळांची भ्रमंती

– अमृतमहोत्सवानिमित्त मनपाच्या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या ‘नो युवर नागपूर’ (नागपूरला जाणून घ्या) हा उपक्रम नुकताच यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमाला मनपाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाने विद्यार्थ्यांनी नागपुरातील ऐतिहासिक स्थळे, प्रेक्षणीय ठिकाणे व महानगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांना भेट देण्याच्या भ्रमंतीचा आनंद घेतला.

नागपूर महानगरपालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केला आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा व निबंधलेखन स्पर्धा आयोजित केले जात आहेत. या साखळीत मनपाच्या शिक्षण विभागाने 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान आपल्या ‘नो युवर नागपूर’ (नागपूरला जाणून घ्या) हा उपक्रम राबविला. नागपुरात असलेली ऐतिहासिक स्थळे, प्रेक्षणीय ठिकाणे व महानगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

मनपाच्या विद्यार्थ्यांनी नागपुरात असलेल्या एअर फोर्स संग्रहालयाला भेट दिली. देशाच्या संरक्षणात वायू सेनेचे अमूल्य योगदान आहे. या एअर फोर्स संग्रहालयाला भेट दिल्याने विद्यार्थ्यांना देशभक्तीचे धडेही मिळाले व भविष्यात वायू सेनेत दाखल होण्यासाठी प्रेरणाही मिळाली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी देशाचा नकाशा तयार करण्यासाठी महत्वपूर्ण असलेला झिरो माईल, लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारलेला दीक्षाभूमी व अनेक राजकीय घडामोडींचे केंद्र राहिलेल्या राजभवनला भेट देऊन या स्थळांची ऐतिहासिक माहिती जाणून घेतली.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अंबाझरी तलावाच्या काठावर असलेले विवेकानंद स्मारक, गोरेवाडा प्रकल्प, तसेच महानगरपालिकेचा भांडेवाडीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन शहरातील कचऱ्याची विल्हेवाट कशाप्रकारे लावली जाते, याची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. मनपाच्या विद्यार्थ्यांना तीन दिवस सुरू राहिलेल्या उपक्रमात नागपूरच्या समृद्ध ऐतिहासिक वारसा व महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.