जलजन्य व कीटकजन्य आजारापासून काळजी घेण्याचे आवाहन
नागपूर, ता. १२ : नागपूर शहरात ७ ते ९ जुलै २०२५ दरम्यान आलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे बाधित झालेल्या भागामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाद्वारे सर्वेक्षण करून आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना आलेल्या आहेत.
संततधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्या जलमग्न झाल्या. पाणी आणि चिखलामुळे जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका संभावण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागाच्या झोनस्तरीय चमूने उपाययोजनांसाठी सर्वेक्षण सुरु केले. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, नेहरू नगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या दहाही झोनमधील प्रभावित भागांमध्ये मनपाच्या आरोग्य चमूने सर्वेक्षण केले. अतिवृष्टी सदृश्य भागातील १७६२ घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी १७ वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. अतिवृष्टी सदृश्य भागातील १५ ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे नमूने घेऊन तपासण्यात आले ते सर्व योग्य असल्याचे स्पष्ट झाले. ७४७ घरांमध्ये क्लोरीन ड्रॉप देण्यात आले तसेच १३० घरी ओआरएस देण्यात आले.
पावसाळा हा विविध जलजन्य व किटकजन्य आजारांना नियत्रंण देणारा ऋतु म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात हवेतील आद्रतेमुळे विषाणू, जीवाणू वाढतात त्यामुळे अन्न व पाणी दुषीत होण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यामध्ये पिण्याचे पाणी काही कारणाने दुषित झाल्यास कॉलरा, टायफाईड, गॅस्ट्रो, हगवण अशा आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. तसेच उघड्यावरील खाद्य पदार्थांवर माशा बसून ते दूषित झाल्यास उलट्या, जुलाब, कावीळ अशा प्रकारचे आजार होतात. मनपा साथरोग प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना अंतर्गत सर्व जलजन्य आजारी रुग्णांची माहिती प्राप्त होताच रुग्णाच्या निवासी परीसरात भेट देऊन गृहभेटी, सर्वेक्षण, जनजागृती व पाणी नमुने तपासणी करण्यात येते. या सोबतच गृहभेटीद्वारे रुग्णाचा शोध घेऊन त्यांना उपचार व मार्गदर्शन करण्यात येते. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये जलजन्य आजाराचे प्रमाण वाढते. म्हणून नागरिकांनी याबाबत आरोग्यदृष्टया काळजी घेणे आवश्यक आहे. संबंधित आजारांची कुठलीही लक्षणे आढळल्यास आपल्या जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन निःशुल्क तपासणी व उपचार करून घावे, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे. नागपूर शहरात मनपाचे ५९ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ७९ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र कार्यरत आहेत.
जलजन्य आजारापासून अशी घ्या काळजी
– मनपा नळावाटे पुरवठा होणाऱ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोरवेल शुध्दीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करु नये.
– शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्न पदार्थ खाऊ नये तसेच अन्न पदार्थ व्यवस्थित झाकुन ठेवावेत.
– हातगाड्यावर उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाऊ नये.
– पावसाळ्याच्या पिण्याचे पाणी उकळून थंड करुन प्यावे.
– पिण्याचे पाणी दुषित आढळल्यास त्यामध्ये क्लोरीन गोळ्यांचा वापर करावा व एक क्लोरीनची गोळी २० लीटर पाण्यामध्ये चुरा करुन टाकावी.
– पावसाळ्यात खाद्य पदार्थ उघडे न ठेवता झाकुन ठेवावे, भांडी स्वच्छ ठेवावी, तसेच परिसर स्वच्छ ठेवावा.
– भेलपुरी, पाणीपुरी वाल्याची पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा, क्लोरीनच्या गोळीचा वापर करावा व हॅन्डग्लॉल्जचा वापर करावा.
– प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे.
– उलट्या, जुलाब, कावीळ, गॅस्ट्रो, टायफाईड झाल्यास त्वरित आपल्या जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करावेत. सर्व मनपा व शासकीय दवाखान्यामध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
– ताप, मळमळ, चक्कर, उलटी, हगवन इत्यादी गॅस्ट्रोची लक्षणे असून रुग्णाला त्वरीत ओ.आर.एस. पाजावे व त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार करुन घ्यावा.
– सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे उपचारास आलेल्या अशा रुग्णांची माहिती मनपा आरोग्य विभागाला त्वरित द्यावी.
– डेंग्यू, मलेरिया यासारख्या किटकजन्य आजारांपासून संरक्षणासाठी नागरिकांनी आपल्या घरातील पाणी जमा असलेली ठिकाणे शोधून त्यातील डासअळी नष्ट करून घ्यावी तसेच आपल्या घरी येणाऱ्या मनपाच्या ‘ब्रीडिंग चेकर्स’ला सहकार्य करावे.
– नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.





