– बी.के.सी.पी. कन्हान व शासकीय आश्रमशाळा कोलितमाराचे घवघवीत यश
पारशिवनी :- तालुका क्रीडा समितीच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत आयोजित पारशिवनी तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा राष्ट्रिय आदर्श विद्यालय च्या पटागणात मंगलवारी मोठा उत्साहात आणि चुरशीच्या वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध मैदानी खेळांमध्ये उल्लेखनीय कौशल्य दाखवत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यात बी.के.सी.पी. कन्हान आणि शासकीय आश्रम शाळा कोलितमारा यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपदाचा मान पटकावला.
स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माया दुबळे, लुकेश वऱ्होकर, दुर्गा ईडीपाची (शिक्षण विस्तार अधिकारी, पारशिवनी), माधव काठोके (ज्येष्ठ शारीरिक शिक्षण शिक्षक, कन्हान), अमित सिंग (शारीरिक शिक्षक बि के सी पी ), शैलेश देशमुख (शारीरिक शिक्षक), राजेश भोतमांगे, राजू बर्वे (प्राचार्य, राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव खैरी) तसेच साक्षोधन कडबे (ज्येष्ठ शिक्षक) प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंना मार्गदर्शन करत क्रीडा संस्कृती जोपासण्याचा संदेश दिला.
विविध मैदानी खेळांची चुरस
या स्पर्धेत १०० मी., २०० मी. व ८०० मी. धावणे, रिले शर्यत, लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, गोळाफेक आणि हॅमरफेक यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. सर्वच खेळाडूंनी खेळभावनेने सहभागी होऊन उत्कृष्ट क्रीडा गुणांचे प्रदर्शन केले. विजेत्या शाळा व खेळाडूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यशस्वी आयोजन
या क्रीडा महोत्सवाचे यशस्वी संयोजन तालुका क्रीडा संयोजक रितेश श्रा. मैंद यांनी केले.





