खापा, वार्ताहर :- नगर परिषद खापाची २६ फेब्रुवारी रोजी गुरुवारला सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यासभेत सभागृहात विविध विषयावर चर्चा झाली. पण दोन विषयावर सभागृह खुप गाजले. एक अवाजवी प्रमाणात वाढवलेले पाणी कर आणि अभ्यासिकेचे नामकरण.
नियमबाह्य करवाढ करून जनतेला त्याचा अवाजवी भुर्दंड सहन करवा लागणार आहे. या विषयावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीट्टीत करवाढ अंदाजे २५ टक्के करून सरासरी एक हजार रुपये कर करावे असे ठाम मत मांडले. यासाठी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी कडक विरोध दर्शविला. परंतु ही वाढ अंदाजे ८५ टक्क्याने करीत १५०० रुपये करून जनतेवर अवाढव्य कर लादण्यात आले.
तसेच प्रभाग ९ मधील गुमागाव माइन वसाहत येथे स्थित नगर परिषद अभ्यासिकेचे नाव हे थोर महापुरुषाच्या नावावर ठेवावे असे मत मांडले. परंतु सभागृहात एका विशेष संघटनेशी जुळलेले स्थानिक कार्यकर्ते यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. विशेष म्हणजे भाजपचे गटनेते तथा स्थायी समिती सदस्य रवि परतेती यांनी विरोध दर्शविला. या विरोधाला काँग्रेसच्या नगरसेवकांनी समर्थन दिले. भविष्यात जुनी वस्ती येथे एखादी वास्तू निर्माण करण्यात येईल. तेव्हा त्यांच्या स्थानिक एरियामध्ये त्यांचे नाव देण्यात यावे. असे मत रवि परतेती यांनी मांडले.

या करवाढी विरोधात (दि.५) गुरुवारला काँग्रेस कमेटी, युवक काँग्रेस व नवयुवक व्यापारी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. बाजार चौक येथे स्थित गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. प्रशासन विरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा नगरपरिषद येथे पोहोचला. पाणीपट्टी कर, दुकान गाडेकर या विरोधात मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्ते, व्यापारी, शहरातील नागरिक उपस्थित होते.
नगराध्यक्ष पियुष बुरडे यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले, की सन २००२ पासून पाणीपट्टीत करवाढ करण्यात आलेली नाही. शासनाचा नियमानुसार दर तीन अथवा पाच वर्षानंतर कर वाढ करण्यात येते. तरी ती करण्यात आली नाही. पाटबंधारे विभाग, विद्युत विभाग यांचा अंदाजे दोन करोड रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. इतका अवाढव्य कर्जाचा डोंगर घेऊन नगरपालिका उभी आहे. यातून सावरण्याकरिता करवाढ ही अपेक्षित आहे आणि याकरिता जनतेने सहकार्य करावे. असे आवाहन बुरडे यांनी केले.
“नगराध्यक्ष पियुष बुरडे यांची चाणक्य नीति पडली फोल”
नवनियुक्त नगराध्यक्ष बुरडे यांनी आपल्या चाणक्य नीतिचा वापर करून कमी संख्याबळ असूनही नगरपरिषद मध्ये एक हाती सत्ता मिळवली. या सत्तेचा वापर करीत विविध ठराव सत्ताधारी नगरसेवकांना विश्वासात घेऊन सभागृहात पारित करून घेण्यात येत आहे.
प्रतिक्रिया :-
१) खापा नगरपरिषदेचे दरडोई उत्पन्न हे अंदाजे दहा रूपये असून खर्च अंदाजे २१ रूपये आहे. त्यात कारभार कसा चालवायचा हा प्रश्न उपस्थित होतो. याचा तोडगा काढण्याकरिता सर्वपरीने विचार करीत ही करवाढ करण्यात येत आहे. जनतेच्या भावनेचा आदर करीत आम्ही विशेष सभेचे आयोजन करून यावर तोडगा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
– पियूष बुरडे नगराध्यक्ष न. प. खापा.
२) विजेचे दर हे खूप वाढलेले असून पाणीपट्टीतून होत असलेल्या उत्पन्नापेक्षा विजबिल हे तिपटीने येत असते. दुरुस्तीकरण, इतर व्यवस्थापन खर्च हे निजोयन संतुलित करण्यासाठी आणि नगरपरिषदचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने ही करवाढ करण्यात येत असून त्यात कसलाही दुसरा हेतू नाही. जनतेच्या मागणीनुसार विशेष सभेचे आयोजन करून यावर तोडगा काढण्याच्या प्रयत्न आम्ही करणार आहे.
– रोशनी शेखर डेरे, सभापती पाणीपुरवठा, न. प. खापा.
३) नियमबाह्य आणि दुप्पट प्रमाणात केलेल्या करवाढीला काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा विरोध आहे. आम्ही या अवाजवी प्रमाणात वाढवलेल्या कराचा निषेध करतो.
– नामदेव गजभिये, गटनेता काँग्रेस तथा नगरसेवक न. प. खापा.
४) प्रभाग ९ मधील गुमागाव माइन वसाहत येथील अभ्यासिकेला आम्ही थोर महापुरुषांचे नाव सुचविलेले होते. परंतु त्यावर त्यांनी मतदान करून संख्याबळ जास्त असल्याने ठराव पारित केले. आणि महादेवजी कतवारे यांचे नाव देण्यात आले.
– आशिष ढाले, प्रतोद तथा नगरसेवक न. प. खापा.
५) प्रभाग ९ मधील गुमागाव माइन वसाहत येथील स्थानिक नागरिकांचा विचार करून अभ्यासिकेला महापुरुषांचे नाव देऊन नामकरण करावे.
– रवी परतेती, गटनेता भाजप तथा नगरसेवक न. प. खापा.
६) खापा शहरातील बाजारपेठेची स्थिती ही अत्यंत दयनीय आहे. त्यातही व्यवसायिक हे आपले थातूरमातूर व्यापार व्यवसाय करून प्रपंच चालवतात. त्यातही २५ टक्के करवाढ म्हणजे त्यांच्यावर एक लादलेला बोजाच आहे. तरी यावर गांभीर्याने विचार करून ही करवाढ शिथिल करून १० टक्के करावी.
– छगन कवडे, स्विकृत नगरसेवक तथा सचिव नवयुवक व्यापारी बहुउद्देशीय संस्था, खापा.




