spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा बस डेपोतील भीषण अपघात: मृतकांच्या वारसाला नोकरी व आर्थिक मदतीचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे आश्वासन

हंसराज, भंडारा :- भंडारा शहरात बस डेपो परिसरात बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या एका भीषण अपघातात रोहित पुरण खेडीकर (वय ३६) आणि त्यांचा अवघ्या ३ वर्षांचा मुलगा रौनक रोहित खेडीकर यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण भंडारा शहरात शोककळा पसरली असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतकांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्यामुळे कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

पालकमंत्र्यांचे तात्काळ निर्देश निवेदनाची दखल घेत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घटनास्थळावरूनच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी अपघाताच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले. तसेच, मृतकांच्या वारसांना नोकरी मिळवून देण्यासाठी येणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून यावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. याशिवाय, मुख्यमंत्री सहायता निधीतून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

मान्यवरांची उपस्थिती निवेदन देताना भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे, नगरपरिषद अध्यक्षा मधुराताई मदनकर, शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, रुबी चड्डा, भगवान बावनकर, अरुण करेमोरे, महामंत्री कल्याणी निखाडे, नगरसेवक मंगेश वंजारी, ललित जांभुळकर, शिव आजबले, नितीन गायधने, मिलिंद मदनकर, सचिन तिरपुडे, नगरसेविका वृषाली ब्राह्मणकर, प्रदीप साठवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या घटनेमुळे खेडीकर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात संपूर्ण शहर सहभागी असून,प्रशासनाकडून लवकरच मदतीचा हात मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Popular Articles