spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ठाकरे गटाची संघटनात्मक ‘मोर्चेबांधणी’; कामठीत महिलांच्या खांद्यावर पक्षाची धुरा

– नागपूर ग्रामीणमध्ये नव्या नियुक्त्या

कामठी :- आगामी काळातील राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नागपूर ग्रामीणमध्ये संघटनात्मक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाची तळागाळातील पकड अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने कामठी तालुक्यासह नागपूर ग्रामीणमधील विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नियुक्त्यांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांना मोठी जबाबदारी देण्यात आल्याने कामठीच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा रंगली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नागपूर जिल्हा ग्रामीण जिल्हाप्रमुख दुर्गाताई कोचे यांनी या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या. पक्ष संघटना अधिक गतिमान करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना थेट वाचा फोडण्यासाठी नव्या नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे.

यामध्ये सपना आकाश पाटील यांची उपजिल्हाप्रमुख, नागपूर ग्रामीण, तर सारिका खुशाल मेश्राम यांची तालुकाप्रमुख, कामठी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सोनाली राकेश येरमे यांची शहरप्रमुख, बिडगाव, तर विना रामदास जाधव यांची उपशहरप्रमुख, बिडगाव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

याशिवाय नीलम बागडे आणि आचल विशाल मराठी यांची बिडगाव, ता. कामठी येथे प्रभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महिला नेतृत्वाला बळ; तळागाळात संघटन विस्ताराचा निर्धार

कामठी तालुक्यातील महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या महिलांच्या खांद्यावर सोपवून पक्षाने महिला नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचे या नियुक्त्यांमधून स्पष्ट झाले आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच महागाई, बेरोजगारी, नागरी समस्या, महिला सुरक्षा आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवावा, अशी अपेक्षा पक्ष नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमुळे कामठी तालुक्यात पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, बूथपासून तालुकास्तरापर्यंत संघटना अधिक मजबूत करण्याचे आव्हान आता नव्या पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे.

या नियुक्त्यांमुळे शिवसेना ठाकरे गटाची कामठी तालुक्यातील राजकीय मोर्चेबांधणी अधिक वेगाने होणार असल्याचे मानले जात असून, आगामी काळात स्थानिक राजकारणात या संघटनात्मक बदलांचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेत पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.