नागपूरला 10 जून रोजी दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी जगभरातील लाखो लोकांना आधार देणारी आंतरराष्ट्रीय संस्था अल्कोहोलिक्स अनॉनिमस (A.A.) आपला 91 वा वर्ल्डवाइड फाउंडेशन डे उत्साहात साजरा करीत आहे.
10 जून 1935 रोजी अमेरिकेत बिल डब्ल्यू. आणि डॉ. बॉब यांच्या ऐतिहासिक भेटीतून या चळवळीची सुरुवात झाली. एका मद्यपीने दुसऱ्या मद्यपीला दिलेला आधार आणि अनुभवाची देवाणघेवाण हा या संस्थेचा मूलभूत पाया ठरला. आज A.A. ही संस्था जगातील 183 देशांमध्ये कार्यरत असून सुमारे 40 लाख सदस्य या फेलोशिपशी जोडलेले आहेत. भारतातही A.A. चे 4,000 हून अधिक समूह कार्यरत असून 50 हजारांपेक्षा अधिक सदस्य मद्यमुक्त जीवन जगत आहेत. परस्पर सहकार्य, अनुभव आणि आशेच्या बळावर ही फेलोशिप अनेकांना दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मदत करीत आहे. 91 व्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील A.A. समूहांकडून जनजागृती कार्यक्रम, माहितीपर खुल्या सभा (Open Informational Meetings) तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यात येत आहे. व्यसनाधीनतेशी संबंधित सामाजिक कलंक दूर करणे आणि मदत उपलब्ध असल्याची जाणीव समाजात निर्माण करणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. A.A. मध्ये सदस्यत्वासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. दारू सोडण्याची प्रामाणिक इच्छा हीच सदस्यत्वाची एकमेव अट आहे. संस्था कोणत्याही धर्म, जात, राजकीय विचारसरणी किंवा सामाजिक गटाशी संलग्न नसून 12 पायऱ्यांवर आधारित आध्यात्मिक पुनर्वसन कार्यक्रमाद्वारे कार्य करते. अनुभव, शक्ती आणि आशा यांच्या आधारे सदस्य एकमेकांना मदतीचा हात देत मद्यमुक्त जीवनाचा मार्ग दाखवितात.
मोफत मदत व अधिक माहितीसाठी संपर्क : पब्लिक इन्फॉर्मेशन कमिटी, नागपूर
📞 7448220679, 7972809017, 7020007969, 8007345006
दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







