– पारेंद्र पटले यांचा प्रफुल्ल गुडधे यांच्यावर जोरदार पलटवार
नागपूर :- नागपूर शहर काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी पदग्रहण सोहळ्यात “वडिलांनी सुरू केलेले भाजपचे दुकान आम्हीच बंद करणार” असे वक्तव्य करून भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याला भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष पारेंद्र पटले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पारेंद्र पटले म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हे कोणाचे दुकान नसून देशातील कोट्यवधी नागरिकांचा विश्वास, आशा आणि श्वास आहे. कार्यकर्त्यांच्या त्याग, समर्पण आणि जनसेवेच्या बळावर उभा राहिलेला हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यालाही सन्मानाने काम करण्याची संधी मिळते. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा मानला जातो. त्यामुळे भाजपला ‘दुकान’ म्हणणे म्हणजे लाखो कार्यकर्त्यांच्या कष्टांचा अपमान आहे.
ते पुढे म्हणाले की, परिवारवाद, घराणेशाही आणि स्वार्थी राजकारणाचा इतिहास पाहायचा असेल तर काँग्रेसकडे पाहावे लागेल. देशापासून राज्य आणि स्थानिक पातळीपर्यंत काँग्रेसमध्ये नेहमीच काही मोजक्या कुटुंबांचे हित जपले गेले. जनतेच्या प्रश्नांपेक्षा परिवाराचे राजकारण महत्त्वाचे मानणाऱ्या काँग्रेसने देशाला काय दिले, याचे उत्तर आज जनताच देत आहे.
प्रफुल्ल गुडधे यांनी ज्या प्रभागात अनेक वर्षे राजकारण केले, त्या भागाच्या विकासाचे उत्तर त्यांनी आधी द्यावे, असा सवालही पटले यांनी केला. “ज्या भागात साधे खेळाचे मैदान उभे राहू शकले नाही, जिथे स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय होती आणि मृत्यूनंतरही नागरिकांच्या कुटुंबियांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या, त्या भागाचा विकास नेमका कुठे झाला?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
झोपडपट्टीधारकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या इमारती उभ्या करण्यात काही नेते व्यस्त होते, असा आरोपही पटले यांनी केला. ते म्हणाले की, खऱ्या अर्थाने जनतेच्या समस्या सोडविण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य देण्याची काँग्रेसची परंपरा राहिली आहे.
मनपा निवडणुकीच्या संदर्भातही त्यांनी गुडधे यांच्यावर टीका केली. “आरक्षणामुळे महिलांसाठी जागा राखीव झाल्यानंतर पक्षातील निष्ठावान महिला कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी उमेदवारी स्वतःच्या घरातच ठेवण्यात आली. अशा पद्धतीने पक्ष वाढत नाही. कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकण्याऐवजी त्यांचे मनोबल खच्चीकरण करणाऱ्या नेतृत्वामुळेच काँग्रेसची आजची अवस्था झाली आहे,” असे पटले म्हणाले.
काँग्रेस पक्ष आज अस्तित्व टिकविण्याची लढाई लढत असताना भाजपचे दुकान बंद करण्याच्या पोकळ वल्गना करणे म्हणजे निव्वळ राजकीय दिवास्वप्न आहे. भाजपने कधी काँग्रेसप्रमाणे ‘दुकानदारी’ केली नाही. जनतेच्या विश्वासावर, विकासाच्या राजकारणावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर हा पक्ष उभा आहे आणि पुढेही अधिक मजबूत होत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“भाजपचे दुकान बंद करण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा काँग्रेसच्या दुकानाचे शटर कायमचे बंद होणार नाही, याची चिंता प्रफुल्ल गुडधे यांनी करावी. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहून राजकारण होत नाही; त्यासाठी जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे प्रेम कमवावे लागते,” असा टोला लगावत पारेंद्र पटले यांनी आपल्या प्रतिक्रिया समाप्त केल्या.







