किशोर साहू, मौदा :- खंडाळा (पिपरी) येथील आयोजक हनुमान मंदिर देवस्थान पंचकमिटी कडून समस्त ग्रामवासियांच्या सहकार्याने वारकरी सांप्रदायाची जोपासना करून गावात हिंदू धर्माला टिकवून ठेवण्यासाठी यंदा 38 व्या वर्षीही अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण समारोह चे आयोजन शुक्रवार (ता. 20 फेब्रुवारी) पासून सुरू असून उद्या शनिवार (ता. 28 फेब्रुवारी)ला या भव्य आयोजनाचा भव्य महाप्रसादाने थाटात समारोप होणार आहे .
शुक्रवार (ता.20 फेब्रुवारी)ला महोत्सवाची सुरुवात ज्योत प्रज्वलन व कलश स्थापनेने अडेगावचे ह भ प पांडुरंग शेंडे महाराज यांच्या हस्ते झाले. प्रवीण गुर्वे महाराज यांच्या हस्ते विना पहारा व ज्ञानेश्वरी पारायणची सुरुवात झाली. 25 व 26 फेब्रुवारीला सायं. सात वाजता कुशल वैद्य महाराज यांनी नाथाची अभंगवाणी भारुड चे सादरीकरण केले. २० ते २७ फेब्रुवारी पर्यंत श्रावण महाराज, प्रल्हाद महाराज, टिकेश्वरचंद महाराज, विजय महाराज, श्रद्धा वानखेडे, हरिश्चंद्र महाराज ,विलास महाराज, सोपान महाराज यांचे जागर कीर्तनाचे कार्यक्रम झाले.
रोज सकाळी सहा ते सात वाजता वाजेपर्यंत काकडा ,भजन व विष्णुसहस्त्रनाम, सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत भजन, दुपारी तीन ते सायं. पाच वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी पाच ते साडेपाच पर्यंत सामूहिक प्रार्थना, सायंकाळी सहा ते साडेसात पर्यंत हरिपाठ रात्री आठ ते दहा पर्यंत हरी किर्तनाचे कार्यक्रम पार पडले.27 फेब्रुवारीला जागृती भजन कार्यक्रम झाला. यामध्ये जय बजरंग भजन मंडळ पिपरी, आष्टी, शिवनी, घोटमुंढरी, ढोलमारा, नवरगाव, रेवराल ,रेवराल (टोली), राजोली, वीरसी, चारबा, सुंदरगाव या परिसरातील गावातील भजन मंडळाचे सहकार्य मिळाले.
शनिवार 28 फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता दिंडी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत मूर्तिजापूर येथील ह भ प सोपानकाका कालपांडे महाराज यांच्या अमृतमय वाणीतून गोपालकाल्याचे कीर्तन, त्यानंतर गुरुवर्य हरीओम पटले महाराज, दामोदर वंजारी महाराज, पद्माकर तांबुलकर महाराज ,घनश्याम वैरागडे महाराज, जयराम घाटोळे महाराज, सुदामा ढोबळे महाराज, माधो गिरडकर महाराज, अर्जुन गिरडकर महाराज, रामकृष्ण गिरडकर महाराज व उपस्थित इतरही मान्यवरांचा शाल व त्रिफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे. या सप्ताह निमित्त खंडाळा(पिपरी )गावाला तोरण, पताके व आकर्षक रोषणाईने सजविण्यात आलेले आहे. तरी या समारोपीय कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.




