केवळ सहा महिन्यांत २० लाख रुपये खर्चून बांधलेला पूल कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये संताप.
खापा, मकसुद शेख ०२ : सावनेर तालुक्यातील गुमगाव येथे शेतकऱ्यांना नाला पार करून शेतात जावे लागत असल्याने, सुमारे सहा महिन्यांपूर्वी या नाल्यावर पूल बांधण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसातच पूल ढासळला. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, ऐन शेतीच्या कामाच्या वेळी पूल खचल्याने बैलजोडी, खते शेतात कशी नेणार, हा बिकट प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत कामाची चौकशी करून संबंधित बांधकाम ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, तसेच पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी गुमगावच्या सरपंच संघमित्रा जिभे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
“म्हणून कोसळला पूल”
पूर्वी शेतकऱ्यांना नाला पार करताना पुर आलाच, तर तासनतास थांबावे लागे. पूल झाल्यानंतर मोठा दिलासा मिळाला होता. मात्र शुक्रवारी रात्रीच्या पावसाने नाला भरून आला आणि नाल्याच्या काठावरील माती पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली. परिणामी पूल रस्त्यापासून सुमारे २० ते २५ फूट आत कोसळून नाल्यात खचला.
या घटनेमुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा गंभीर अडचण निर्माण झाली असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
प्रशासन दखल घेणार का?
परिसरातील शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी पूर्ण केली असून, उगवलेल्या पिकांकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र जोरदार पावसामुळे शेतात जाण्याचा पूलच वाहून गेल्याने, शेतकरी अक्षरशः मनस्ताप व्यक्त करत आहेत.
आता हा पूल केव्हा दुरुस्त होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी आणि मजूर यांचं रोजचं काम या पुलावर अवलंबून होतं. पूलच नसल्यानं शेतात जाण्यासाठी मार्ग कुठून शोधायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासन याची गंभीर दखल घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
शेतात बैलबंडी नेणार कशी?
शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे. आता काही दिवसांत खत आणि शेतीसाठी लागणारे साहित्य शेतात नेणे गरजेचे आहे. मात्र वाहतुकीचा मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बांधकामाच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नाल्यावरील पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी सरपंच संघमित्रा जिभे, उपसरपंच सचिन पाटील, ग्रा.पं. सदस्य रोशन पाटील, सुनील लोणारे, माया सोरमारे, शशिकला खडसे, काजल अवजे, अपेक्षा जिभे, रामकृष्ण काकडे, शेषराव डाखोळे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
“या आहेत अडचणी”
या पूल कोसळण्याच्या घटनेमुळे ५० पेक्षा अधिक गावांतील शेतकरी आणि नागरिक प्रभावित झाले आहेत. खडीकरण झालेला रस्ता पुढे तिघई फाट्याजवळ खापा–पाटणसावंगी मुख्य मार्गाशी जोडतो. त्यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण करणे अवघड झाले आहे.
1) गुमगाव (खापा) मॉयल खानच्या सी. एस. आर. फंडातू 20 लाखाचा निधी मंजूर करून या नात्यावर बांधलेला पूल सहा महिन्यातच खचला, यावरून लक्षात येते की या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. या बांधकामाची संबंधित विभागाकडून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व त्वरित पुलाचे बांधकाम करण्यात यावे. -संघमित्रा जिभे, सरपंच, ग्रा.पं. गुमगाव, ता. सावनेर.
2) नात्यावरील पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. काम बरोबर करण्यात आले नाही. त्यामुळेच पूल खचला, शेतकऱ्यांना नाला ओलांडून जावे लागते. शेतकरी, मजुरांच्या जिवाला धोका आहे. पुलाचे काम लवकर करण्यात पावे. – शेषराव डाखोळे, शेतकरी, गुमगाव.
3) नाल्यावर पूल झाल्यानंतर शेतकऱ्यांची सोय झाली होती. पण हा पूल सहा महिनेही टिकला नाही. पहिल्याच पावसात तो खचला. पुलाचे काम ठेकेदाराने नीट केले नाही. हे काम रात्रंदिवस घाईगडबडीत करण्यात आले, त्यामुळे कामात गुणवत्ता राहिली नाही. आमचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा.
– रामकृष्णा काकडे, शेतकरी, गुमगाव.
4) नाल्यावरील पुलाचे काम गुमगाव खानच्या सी. एस. आर. फंडातून करण्यात आले. काम योग्य झाले नाही. निकृष्ट बांधकाम करण्यात आहे. पूल खचल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने या बाबाची गंभीर दखल घेऊन पुलाचे बांधकाम करण्यात यावे. -सुनील लोणारे, ग्रा.पं. सदस्य, गुमगाव.





