spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्मार्ट टीओडी मीटरचा करिष्मा! नागपूर परिमंडळातील घरगुती वीज ग्राहकांची सात महिन्यांत तब्बल 10 कोटी 37 लाखांची बचत

नागपूर :- वाढत्या महागाईच्या काळात नागपूर आणि वर्धानिवासीयांना दिलासा मिळाला आहे. महावितरणच्या ‘स्मार्ट टीओडी’ (Time of Day) मीटरमुळे या दोन्ही जिल्ह्यातील घरगुती वीज ग्राहकांनी गेल्या अवघ्या सात महिन्यांत आपल्या वीज बिलात तब्बल 10 कोटी 37 लाख 7 हजार 565 रुपयांची घसघशीत बचत केली आहे. दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे तंत्रज्ञान आता खऱ्या अर्थाने ‘वरदान’ ठरत आहे,

सध्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरणाऱ्या स्मार्ट मीटरधारकांना प्रति युनिट तब्बल 85 पैशांची थेट सवलत मिळत आहे. या योजनेमुळे एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या सात महिन्यांच्या काळात नागपूर जिल्ह्यातील ग्राहकांनी 8 कोटी 85 लाख 99 हजार 549 रुपये, तर वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांनी 1 कोटी 51 लाख 8 हजार 15 रुपयांची बचत केली आहे. विशेष म्हणजे, या सवलतीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या दरमहा सातत्याने वाढत असून, ऑक्टोबर महिन्यात 5 लाख 1 हजार 572 ग्राहकांनी तब्बल 1 कोटी 43 लाख 70 हजार 273 रुपयांची सवलत मिळवली आहे.

सौर ऊर्जेचा प्रभावी वापर आणि पारदर्शकता: या संपूर्ण यशाच्या मुळाशी दिवसा उपलब्ध होणारी स्वस्त सौर ऊर्जा आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार मिळणारी ही 85 पैशांची सवलत नजीकच्या काळात 1 रुपया प्रति युनिटपर्यंत वाढणार आहे. मात्र, या फायद्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांच्या घरी स्मार्ट टीओडी मीटर असणे आवश्यक आहे. महावितरणने या मोहिमेत पूर्ण पारदर्शकता ठेवत आधी स्वतःच्या कार्यालयांतून आणि कर्मचारी वसाहतींमधून या मीटरची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.

महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे आता ग्राहक आपल्या वीज वापराचा ‘रिअल टाईम’ डेटा पाहू शकतात. दर तासाला किंवा दिवसाला किती वीज खर्च झाली, याची अचूक माहिती हातात उपलब्ध असल्याने ग्राहकांना स्वतःच्या वीज वापराचे नियोजन करणे अत्यंत सोपे झाले आहे.

अफवांना पूर्णविराम; मीटर बसवणे पूर्णतः मोफत: काही भागांत या स्मार्ट मीटरबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून विरोध दर्शविण्याचा प्रयत्न झाला होता; परंतु या मीटरमुळे होणारे प्रत्यक्ष आर्थिक लाभ समोर आल्यानंतर हा विरोध आता पूर्णपणे मावळला आहे. याविषयी बोलताना नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी ग्राहकांना वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, “हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे. या मीटरमुळे बिल वाढते हा दावा पूर्णपणे निराधार असून, यामुळे केवळ वीज वापराचे अधिक अचूक वाचन मिळते.”

सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या अफवांना न जुमानता आणि कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता, वीज बिलात घसघशीत सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांनी स्मार्ट मीटरच्या या लोकउपयोगी प्रवासात महावितरणला सढळहस्ते सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles