नागपूर :- राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कंत्राटी कामगार संघटनेने मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले असल्याची माहिती तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन चे राज्यकार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.
संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, कंत्राटी कामगारांच्या अनेक गंभीर समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, शासन व प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासने देण्यात आली असली तरी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे राज्यातील कंत्राटी कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
निवेदनात कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगाराची हमी देणे, कल्याणकारी मंडळ स्थापन करणे, विमा संरक्षण लागू करणे, कुटुंबीयांची नोंदणी अद्ययावत करणे, सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देणे यांसारख्या महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. तसेच काही ठिकाणी एजन्सीकडून होत असलेल्या अन्यायकारक वसुलीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, विविध कारणांमुळे कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेणे, गणवेश पुरवणे आणि मृत कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना प्रलंबित लाभ देण्याची मागणीही संघटनेने केली आहे.
मुख्यमंत्री यांच्याकडून या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर उच्चस्तरीय बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
यावेळी नागपूर जिल्हाध्यक्ष मंगेश चिमोटे व रितीक वानखेडे उपस्थित होते.

