– महापौर निता ठाकरे यांच्यासमोर हेल्दी स्ट्रीट उपक्रमाचे सादरीकरण
नागपूर :- नागपूर शहरातील नागरिकांना रस्ते, फुटपाथ, पार्किंग, सायकलस्वार व पादचाऱ्यांची सुरक्षितता व रहदारीसाठी सुलभता लक्षात घेऊन नागपूर हेल्दी स्ट्रीट कार्यक्रमाअंतर्गत रस्ते व चौकांचे डिझाईन तयार केले जात आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती अधिक वाढवावी, असे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी दिले.
आयटीडीपी इंडियातर्फे प्रभाग क्रमांक १४ व १५ मध्ये हेल्दी स्ट्रीट उपक्रमांतर्गत रस्ते व चौकांचे डिझाईन तयार करण्याच्या संदर्भात आज (ता. 18) डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभाकक्षात संगणकीय सादरीकरणाच्या (पीपीटी) माध्यमातून सादरीकरण केले. यावेळी सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नगरसेवक विनय दाणी, नगरसेविका धनश्री देशपांडे, नगरसेविका वर्षा चौधरी, नगरसेविका पूजा पाठक, नगरसेवक विनोद कन्हेरे, नगरसेवक अभिजीत झा, नगरसेविका माधुरी फुलसुंगे, नगरसेविका योगिता तेलंग, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे उपस्थित होते.

आयटीडीपीचे आर्किटेक्ट अर्बन डिझायनर प्रसन्न देसाई यांनी हेल्दी स्ट्रीट कार्यक्रमाचे पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण दाखविले. या कार्यक्र्माअंतर्गत प्रभाग १४ व प्रभाग १५ मध्ये प्रत्येकी एक रस्ता विकसित केला जाणार आहे. हे विकसित करताना लोकप्रतिनिधींना माहिती देणे व त्यांच्या सूचनांवर अंमलबजावणी करून लोकसहभागातून हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रामुख्याने या सादरीकरणाचा उद्देश होता.
यावेळी प्रसन्न देसाई यांनी राज्यामधील विविध शहरात सुरू असलेल्या हेल्दी स्ट्रीट उपक्रमाची माहिती दिली. तसेच नागपुरात सुद्धा हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जाणार आहे. यामुळे शहरातील रस्त्यांची रुंदी कमी होणार नसून, त्याचवेळी फूटपाथवरून लोकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय चालता येईल, त्याचप्रमाणे सायकल स्वार व ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना सुद्धा रस्त्यावरून सुरक्षितपणे चालणे शक्य होईल, या कार्यक्रमाअंतर्गत रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जाईल. इंडियन रोड काँग्रेसच्या मानकानुसार, हे रस्ते व चौक विकसित केले जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्या – महापौर ठाकरे
हेल्दी स्ट्रीट कार्यक्रम शहरासाठी चांगला असून पहिल्या टप्प्यात रस्ते व चौक विकसित झाल्यानंतर दुसरा टप्पा सुद्धा सुरू करावा, यासाठी आगामी अर्थसंकल्पात यासंदर्भात तरतूद करावी, असे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी यावेळी दिले. या कार्यक्र्माची अंमलबजावणी करण्यापूर्वी लोकप्र्तिनिधी व नागरिकांच्या सूचना विचारात घ्याव्या, असेही महापौरांनी यावेळी सुचविले. प्रारंभी कार्यक्रमाचे व्यवस्थापक प्रांजल कुलकर्णी यांनी या सादरीकरणामागची भूमिका मांडली. यावेळी आयटीडीपीचे सिद्धार्थ गोडबोले व स्मृती सवाणे उपस्थित होते.
नव्या तंत्रज्ञानाचा वापर – आयुक्त डॉ. चौधरी
हेल्दी स्ट्रीट उपक्रमाअंतर्गत तयार होणारे रस्ते व चौकाच्या विकसित करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाने तयार केलेल्या साहित्यांचा वापर केला जाणार आहे. यामुळे रस्त्यांचे सौंदर्यीकरण व दळणवळणात निश्चितपणे सोयीचे होईल. रस्ते व चौक विकसित करताना रस्त्यांची रुंदी कमी होणार नसल्याचे मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.




