निशा आर्ट गॅलरीच्या तरुणींनी रांगोळीने रेखाटली आई जगदंबेची हुबेहूब प्रतिकृती

0
131

– रांगोळी पाहण्यासाठी होताय भाविकांची गर्दी 

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- सणासुदीच्या काळात धोधो वाहणाऱ्या शुभेच्छा संदेशांमध्ये मंगलमय वातावरण निर्मिती करणाऱ्या रांगोळ्यांचेही फोटो फॉरवर्ड होतात. गेल्या वर्षभरात असे अनेक रांगोळ्यांचे फोटो आले. पण काही रांगोळ्यांनी मनात घर केलं. असंच काहीसं नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी केळापूर जगदंबा संस्थानात घाटंजी तालुक्यातील निशा दरेकर, कविता उपाध्याय, स्विटी भोयर यांच्या निशा आर्ट गॅलरीच्या तरुणींनी केळापूरच्या आई जगदंबेच्या प्रवेशद्वारावर काढलेली ही रांगोळी’… एखादं हुबेहूब चित्र काढावं त्याप्रमाणं रंग अन् रेषांची नजाकत जपत, त्यांचा पुरेपूर वापर करत काढलेल्या त्या रांगोळी पाहिली की मनात अनेक प्रश्न निर्माण होत. तना-मनाने तल्लीन होत काढलेल्या या रांगोळीमागे हातात काय जादू असेल? इतकी अप्रतिम रांगोळी साकारणाऱ्या कलात्मक हातामागे नक्कीच गेल्या जन्मीची पुण्याई किंवा वर्षानुवर्षांची मेहनत असावी. रांगोळीतील बारकावे पाहताना जमलेल्या भक्तांचे भान हरपले. केळापूरची कुलस्वामिनी आई जगदंबेची रांगोळी काढणाऱ्या निशा आर्ट गॅलरी घाटंजीच्या तिन तरुणीने नुकतीच सुरुवात केली होती. पण पंगतीत जेवण वाढण्यात सराइत वाढपी कसे भराभर पदार्थ वाढत जातात. त्याप्रमाणे मुठीतून रांगोळी सोडताना त्यांचा हात मूळ बिंदूपासून गरागर फिरत डिझाइनचं एक वर्तुळ कधी पूर्ण करून येत होता, पाहानाऱ्यांनाच कळत नव्हते. पाहता पाहता नऊ तासात आई जगदंबेची ती ८×८ ची भव्य हुबेहूब मस्त रंगसंगतीत सजून बसला. प्रसिद्धीची फार भूक कुणालाही नाही, पण मौखिक स्तुती ऐकूनच निशा आर्ट गॅलरीच्या तरुणींना विविध जिल्हे, राज्यातही रांगोळ्या काढण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. अशा प्रकारे कला संस्कृती जपणारं, निशा आर्ट गॅलरी घाटंजीच्या तरुणींच्या चमुहला तरी ‘कुणाची दृष्ट न लागो’ याच पठडीतलं वाटलं. रांगोळीसाठी, रांगोळीसोबत आणि हरेक सुख-दु:खाचे क्षण रांगोळीतून व्यक्त करणाऱ्या या कलाकारांची ख्याती अशाच प्रकारे परराज्य, परदेशात पसरू दे, अशी प्रार्थना भक्तांनी आई जगदंबेच्या चरणी केली.