– हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता !
– शेतकऱ्यांच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- विक्रमी संत्रा उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध असलेल्या मोर्शी तालुक्यात ऐन उन्हाळ्यात कृषी पंपांना केवळ ६ तास वीजपुरवठा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू असल्याचा संतप्त आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे. वाढत्या तापमानामुळे संत्रा बागांना वेळेवर व पुरेसे पाणी देणे अत्यावश्यक असताना महावितरणकडून अपुरा वीजपुरवठा केला जात असल्याने हजारो एकरांवरील संत्रा बागा धोक्यात आल्या आहेत.
सध्या तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे जात असताना संत्रा झाडांना नियमित पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र दिनांक २७ मे पासून केवळ ६ तास वीज मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना संपूर्ण बागेला पाणी देणे अशक्य होत आहे. परिणामी फळगळ, झाडांवर ताण, उत्पादनात घट आणि भविष्यातील हंगामावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीच्या घोषणा करत असताना दुसरीकडे संत्रा उत्पादकांना आवश्यक असलेला वीजपुरवठाच मिळत नसल्याने सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लाखो रुपये खर्च करून संत्रा बागा उभ्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संत्रा उत्पादक संकटात असताना त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी इशारा देत म्हटले आहे की, “संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ दिवसा किमान १० तास अखंड वीजपुरवठा करण्यात यावा. अन्यथा महावितरण कार्यालयावर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत न करणाऱ्या प्रशासनाला आंदोलनाच्या माध्यमातून जागे केले जाईल.”
मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण संत्रा पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे सरकार आणि महावितरणने तातडीने हस्तक्षेप करून दिवसा १० तास वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, अशी तीव्र भावना आता शेतकरी व्यक्त करत आहेत.
“मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी झगडत असताना सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. कृषी पंपांना दिवसा १० तासांऐवजी केवळ ६ तास वीज देणे म्हणजे शेतकऱ्यांचा अंत पाहण्याचा प्रकार आहे. एका बाजूला शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्याचे सल्ले दिले जातात, तर दुसऱ्या बाजूला पिके वाचविण्यासाठी आवश्यक असलेली वीजच दिली जात नाही. हा शेतकरीविरोधी कारभार आहे.



