नागपूर :- महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ राज्यच नव्हे, तर देशातील राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनावर शोककळा पसरली आहे. ही घटना एका व्यक्तीच्या निधनापुरती मर्यादित नसून, निर्भिड वक्तृत्व, परखड भूमिका, कणखर नेतृत्व आणि सेक्युलर विचारधारेच्या एका प्रभावी पर्वाचा अस्त आहे. हे महाराष्ट्रासाठी अपूरणीय नुकसान आहे, अशी भावना पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांनी व्यक्त केली आहे.
अजितदादा पवार हे केवळ सत्ताकेंद्रातील नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि सेक्युलर राजकारणाचा बुलंद आवाज होते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, सामाजिक न्याय आणि लोककल्याणाच्या विचारांवर आधारित राजकारण त्यांनी सातत्याने पुढे नेले. जात, धर्म किंवा वर्गभेद न मानता सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवणारी त्यांची भूमिका हीच त्यांच्या राजकारणाची खरी ओळख होती. निर्भिड वक्तृत्व, स्पष्ट आणि थेट भूमिका मांडण्याची ताकद, तसेच कोणत्याही दबावाला न जुमानणारे कणखर नेतृत्व हे अजितदादांचे वैशिष्ट्य होते. सत्ता असो वा विरोध, जनतेच्या प्रश्नांवर ते नेहमीच ठामपणे उभे राहिले. शेतकरी, कामगार, युवक, महिला तसेच वंचित, उपेक्षित घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी कायम संवेदनशील आणि ठोस भूमिका घेतली. लोकहितासाठी कधीही लोकप्रियतेचा विचार न करता निर्णय घेण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. प्रशासनावरची त्यांची पकड, निर्णयक्षमतेतील ठामपणा आणि कामातून परिणाम दाखवणारी शैली यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली.
आज असा अनुभवसंपन्न, लोकाभिमुख आणि पुरोगामी विचारांचा नेता आपल्यातून अचानक निघून जाणे हे महाराष्ट्रासाठी भरून न निघणारे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व हरपलेले नाही, तर संकटाच्या काळात समाजाला धीर देणारा, दिशा दाखवणारा आणि निर्णयक्षम नेतृत्व देणारा बुलंद आवाज आपण गमावला आहे. या दुःखद प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने दिवंगत अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करतो, असेही जयदीप कवाडे यांनी नमूद केले आहे.








