spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘शेत वाचवा’ अभियानातून नैसर्गिक शेतीचा संदेश

– मृदासंवर्धन, जमिनीची सुपीकता आणि शाश्वत कृषी पद्धतींबाबत मार्गदर्शन

नरखेड, प्रतिनिधी :- नरखेड तालुक्यातील सिंदी (उमरी) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ‘शेत वाचवा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि कृषी जमिनीचे संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जमिनीची सुपीकता टिकविण्यावर भर

शेतीचे उत्पादन वाढविण्यासोबतच जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या अभियानात नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. पौष्टिक अन्नधान्य उत्पादन, मृदासंवर्धन, जलव्यवस्थापन आणि पीकसंरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. शेतीतील संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी वैज्ञानिक आणि योग्य कृषी पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान पोखरा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत कृषी पद्धतींचा वापर करून शेतीचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देण्यासह कृषी जमिनीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला.

कृषी अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

आत्मा, नागपूरच्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू आणि नरखेडचे तालुका कृषी अधिकारी कार्तिक कोली यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी रोशन चंडीमेश्राम, उपकृषी अधिकारी पंकज कोकाटे आणि तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश रिधोरकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांना विविध कृषी विषयांवर माहिती दिली.

या वेळी शेतकरी गटातील सदस्यांसह मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या. नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती करणे, जमिनीचे संवर्धन करणे आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.

Popular Articles