– श्रावस्ती बुद्ध विहारात महावंदना व धम्मदेशना
यवतमाळ :- बुद्ध, धम्म आणि संघ या मार्गावर खऱ्या अर्थाने अनुसरण करणारे भंतेजी आहेत. त्यांनीच खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म जना माणसात रुजविला आहे. त्यांच्या अनुसरणानुसार भंतेजी चा मार्ग खऱ्या अर्थाने निर्वाण पदाकडे जाणार आहे असे प्रतिपादन फुले आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष किशोर भगत यांनी केले. श्रावस्ती बुद्ध विहार, गिरिजा नगर यवतमाळ येथे आयोजित महावंदना व धम्मदेशना या कार्यक्रमात ते बोलत होते. त्रिपित्यक व मिलिंद प्रश्न यातील उदाहरणे देत ते म्हणाले की, आपल्या धम्म गुरुचा मान सन्मान तो लहान वयाचा असला तरीही. करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
पुढे बोलताना किशोर भगत म्हणाले की, दिल्ली आकाशवाणी वरून बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं स्वातंत्र्य समता, व बंधुभाव हे फ्रेंच क्रांती मधून घेतलं नसून सम्यक संबुध्दा कडून घेतल्याचे त्यांनी सांगितले. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं प्रमुख कार्य भिक्खु संघ धम्माच्या स्थापनेपासून तर आजतागायत नेटाने करीत आहे. बौद्ध संस्कृतीमध्ये वर्षाकालीन वर्षवास अतिशय पवित्र मानला जातो. त्यामुळे गेल्या १७ वर्षापासून दरवर्षी याच कालावधीत फुले – आंबेडकरी साहित्य संसदे द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन विविध तालुक्यात करण्यात येते. यावर्षी दुसरा कार्यक्रम श्रावस्ती बुद्ध विहार गिरिजा, नगर यवतमाळ येथे पार पडला. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील भिक्खूंच्या व भिक्खुणींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महावंदना व धम्मदेसना हा कार्यक्रम पूज्य भदंत बुद्धघोष महाथेरो यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न झाला. हा कार्यक्रम अधिष्ठान पूजेपासून, धम्मध्वजारोहण,महावंदना व धम्मदेसनेपर्यंत सलग सुरू होता. या कार्यक्रमामुळे निश्चितच उपासक ,उपासिका यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचे तरंग पोहोचतील. आपल्या जीवनामध्ये प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री,मुदिता यांची रुजवणूक होण्यास सहाय्यभूत ठरेल. हा कार्यक्रम श्रावस्ती बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष रमेश गडलिंग, उपाध्यक्ष राजू घरडे, सचिव दिलीप गोडे, कोषाध्यक्ष अनिल नाईक, सहसचिव प्रकाश नाईक, सदस्य हरिदास ठोंबरे, जितेंद्र भानसे, मुकुंद घरडे, ज्ञानदीप बागडे, सर्वजण मुनेश्वर, दिलीप गजभिये, गिरीधर ढोक, अनुप गजघाटे, कुणाल सरोदे, सुरेश बोंदाडे यांसह महिला मंडळ, व नगरातील संपूर्ण उपासक, उपासिका यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध करण्यात आला. या अनोख्या आणि अतिशय पवित्र कार्यक्रमाकरिता यवतमाळ मधील वेगवेगळ्या परिसरातील, आजबाजूच्या गावातील श्रद्धासंपन्न उपासक, उपासिका यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप तंबाखे, प्रास्ताविक किशोर भगत तर आभार हेमराज माहुरे यांनी मानले.
२८ सप्टेंबरला समारोप
फुले आंबेडकरी साहित्य संसदेच्या वतीने दरवर्षी महावंदना व धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आतापर्यंत दोन विहारात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा समारोप दिनांक 28 सप्टेंबर रोजी लुंबिनी बुद्ध विहार लुंबिनी नगर यवतमाळ येथे होणार असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख राहुल वासनिक यांनी दिली आहे.




