– भाजपा प्रदेश मुख्य प्रदेश नवनाथ बन यांनी व्हिडिओ दाखवत उघड केले षडयंत्र
मुंबई :- रोहित पवार यांचे एमपीएससी आंदोलन हे विद्यार्थ्यांसाठीचे आंदोलन नाही तर तो राजकीय अजेंडा आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थी त्यात नाहीत हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत. आता हे आंदोलन म्हणजे रोहित पवार यांचे नेतृत्व पुढे आणण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग असल्याचे उघड झाले आहे, असा हल्ला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी चढविला. आंदोलनाच्या ठिकाणच्या भाषणांमध्ये कार्यकर्ते ‘आपल्या रोहितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे’ असे म्हणत असल्याचे अनेक व्हिडिओ बन यांनी यावेळी सादर केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्रातील जनता रोहित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नाला आग लावल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या नौटंकीबाजांच्या पाठीशी कधीच उभा नव्हता. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभा आहे. कारण आम्ही जनता आणि विद्यार्थ्यांसोबत आहोत. राज ठाकरे यांनीही ट्विट करून आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच आनंदाची बातमी येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता कुणाच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीला आग लागेल, हे विवेकानंद पाटील यांच्यासारख्या मंडळींनी ध्यानात ठेवावे, असे बन यांनी फटकारले.

रामरक्षा स्तोत्राचे श्लोक विवेकानंद पाटील यांनी आधी म्हणावेत आणि रोहित पवारांना नंतर वाचून म्हणायला लावावेत. ते जमत नसेल तर वारकरी संप्रदायामध्ये “राम कृष्ण हरी”पासून “सुंदर ते ध्यान, रूप पाहता लोचनी” आणि “हेचि दान देगा देवा” ते “ज्ञानोबा माऊली तुकाराम”पर्यंत कुठलाही एक अभंग विवेकानंद यांनी म्हणावा आणि त्याचे निरूपण रोहित पवारांनी करावे, असे आव्हान देत श्री. बन म्हणाले, त्यानंतर कोण गाढव आहे आणि कोण हरी आहे, याचा सामना जशासतसा होऊन जाईल. महाराष्ट्र तुमची नौटंकी बघत आहे आणि ती उघड झाली आहे.
यापुढे कोणाचा अभ्यास कसा आहे, कुणाचे ज्ञान कसे आहे, हे सांगण्याच्या भानगडीत पडू नये. “अहंकाराचा वारा न लागो” या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायानुसार वागावे. त्यातच विवेकानंदांचे हित आहे. बाकी रोहित पवार आणि मी येणाऱ्या काळात जी काही उत्तरे द्यायची आहेत ती देऊ. कारण ओबीसी असलो, गावकुसाबाहेर राहत असलो तरी तुम्हाला घाबरत नाही. तुमच्या या ट्रोलधाडीला घाबरून मी गप्प बसेन, असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. मी भाजपा आणि देवाभाऊंचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. तुम्हाला तात्त्विक मुद्द्यांवर, तत्त्वज्ञानावर किंवा एमपीएससीवर चर्चा करायची असेल तर रोहित पवारजी, कुठेही खुली चर्चा ठेवा. स्थळ, ठिकाण, वेळ तुम्ही निवडा. आम्ही सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तयार आहोत. परंतु तुमचे मिशन मुख्यमंत्री आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे बन यांनी सुनावले.
शेकडो कोटींची मालमत्ता जमवण्याचा फॉर्म्युला रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना सांगावा
या आंदोलनात कोण कोण सहभागी झाले आहेत? इथे नेमका कोणता नारा दिला जात आहे? विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी नारा आहे की, रोहित पवारांना मुख्यमंत्री करा, हा नारा आहे? याची उत्तरे रोहित पवारांनी द्यावीत. दुर्दैवाने, याची उत्तरे रोहित पवारांकडे नाहीत. यातून त्यांचा राजकीय अजेंडा उघड झाल्याने या आंदोलनाचा पर्दाफाश झाला आहे. आंदोलनातील 20 टक्के विद्यार्थ्यांनाही माझी विनंती आहे की, रोहित पवारांच्या नादी लागू नका. आपल्याकडे शेकडो कोटी रुपयांची प्रॉपर्टी कशी आली, याचा फॉर्म्युला रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना सांगावा. म्हणजे सगळे विद्यार्थी तुमच्यासारखे करोडपती, लखपती होतील. परंतु रोहित पवार ते करणार नाहीत. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतः मुख्यमंत्रीपदी बसवायचे एवढाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे, असा घणाघात बन यांनी केला.








