spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

फिल्मी स्टाईलने पोलिसांची थरारक कारवाई; दोन अट्टल आरोपी २४ तासांत गजाआड

– नवीन कामठीतील दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपींना नागपूर-जबलपूर मार्गावर पाठलाग करून अटक

कामठी :- नवीन कामठी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत फिल्मी थराराला साजेशी कामगिरी करत दोन अट्टल आरोपींना गजाआड केले. दुचाकीवरून पाठलाग करीत पोलिसांनी शेरे पंजाब ढाब्याजवळ दोघांना पकडत त्यांच्या मुसक्या आवळल्या.

रविवारी सकाळी सुमारास अकराच्या दरम्यान भूषण नगर येथील रहिवासी एहफाज अहिम शेख (२१) हा आपल्या कामानिमित्त बाहेर पडला असता, कलमना रोडवरील जयभीम चौकात दोन अज्ञात इसमांनी त्याला अडवले. दुचाकी हिसकावण्याचा प्रयत्न करताना आरोपींनी शेखच्या गळ्यावर मारहाण केली व दुचाकीसह फरार झाले.

तक्रार दाखल होताच नवीन कामठी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ३०९(६), १२६(२), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

सोमवारी नागपूर-जबलपूर महामार्गावरील शेरे पंजाब ढाब्याजवळ आरोपी दिसल्याची माहिती पोलिसांना मिळताच डिबी पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांच्या हालचाली लक्षात येताच आरोपींनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने दुचाकीवरून पाठलाग करत काही अंतरावर दोघांनाही पकडले.

ताब्यात घेतल्यानंतर आरोपींची चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे मो. इमरान उर्फ इम्म्यु मो. एजाज (२८, रा. भाजी मंडी कामठी) व साजिद अहमद (३२, रा. सैलाब नगर कामठी) असे असून दोघेही पूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

ही धाडसी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे व सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाचे पोलिस कर्मचारी बिरजुचंद उईके, नरेश खरकबांध, राहुल वाघमारे, नसीम अन्सारी आणि श्याम गौर यांनी केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पी. एस. आय. संदीप भिताडे करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.